४ वर्षे, १४ मृत्यू...!

By Admin | Updated: August 5, 2014 00:16 IST2014-08-04T22:39:07+5:302014-08-05T00:16:11+5:30

पुरेसा औषधसाठा : लेप्टोच्या ३४६ रुग्णांची नोंद

4 years, 14 deaths ...! | ४ वर्षे, १४ मृत्यू...!

४ वर्षे, १४ मृत्यू...!

रत्नागिरी : मागील चार वर्षांमध्ये लेप्टोस्पॉयरोसिस या जीवघेण्या रोगाचे ३४६ रुग्ण आढळून आले असून, १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या आर्थिक वर्षातील चालू पावसाळ्यामध्ये जिल्ह्यात एकही रुग्ण सापडलेला नाही, ही बाब जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या दृष्टीने भूषणावह आहे.
लेप्टोस्पॉयरोसिस हा रोगबाधित प्राणी उंदीर, डुक्कर, गाई, म्हशी व कुत्री यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. हे जंतू एक वर्षापर्यंत लघवीतून बाहेर पडतात. काही प्राण्यांत आयुष्यभर हे जंतू शरीरात राहतात. या प्राण्यांच्या लघवीचे दूषित पाणी, माती भाज्या व माणसांच्या त्वचेशी संपर्क आल्यास हा रोग होतो.
मागील चार वर्षांच्या पावसाळ्यामध्ये लेप्टोने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सन २०१०-११ मध्ये २५ जणांना या रोगाची लागण होेऊन २ लोक दगावले होते. तसेच २०११-१२ या दुसऱ्याच वर्षीच्या पावसाळ्यामध्ये १३८ जणांना लेप्टोची लागण झाली होती. त्यामध्ये ९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात ८२ जणांना लेप्टो झाला असला तरी एकही रुग्ण मृत्यू पावलेला नाही. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात लेप्टोचे १०१ रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये उपचार सुरु असताना लेप्टोच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. चार वर्षांत आरोग्य विभागाने लेप्टोबाबत जोरदार प्रचार, प्रसार मोहीम राबवली होती.(शहर वार्ताहर)
चिपळुणात लेप्टोची संशयित रुग्ण
चिपळूण तालुक्यातील कोंढे माळवाडी येथील आशा वर्कर श्रद्धा राकेश तावडे हिची आई सरिता सदाशिव करंजकर (५५) हिला दि. २५ जुलै रोजी ताप आला म्हणून चिपळूण येथील डॉ. पुजारी यांच्या रुग्णालयात आणण्यात आले. ती लेप्टो संशयित असल्याने तिच्यावर त्याप्रकारचे उपचार सुरु आहेत. कोंढे गाव खरवते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित येते. त्यामुळे ही बातमी समजताच खरवते प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परेदशी व डॉ.विनायक सर्जे यांनी कोंढे माळवाडी येथे भेट देऊन माहिती घेतली.

Web Title: 4 years, 14 deaths ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.