आसूदमधील ३५0 एकर बागेला ३६५ दिवस मिळतं २४ तास पाणी
By Admin | Updated: December 29, 2015 00:48 IST2015-12-28T23:24:35+5:302015-12-29T00:48:50+5:30
दापोली तालुका : पाचशे वर्षांपूर्वीच्या नियोजनाला येतात आजघडीलाही फळं, ग्रामस्थांनी घालून दिलाय पाणी वाटपाचा आदर्श धडा

आसूदमधील ३५0 एकर बागेला ३६५ दिवस मिळतं २४ तास पाणी
शिवाजी गोरे ल्ल दापोली
कायमस्वरूपी पाण्याचा ओघ आहे, असं गाव आता मोठ्या मुश्किलीनेच सापडेल. डिसेंबर-जानेवारीपासून पाणी कमी होऊ लागतं आणि फेब्रुवारीपासून उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठीच वापरले जाते. पण रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील आसूद हे गाव मात्र त्याला अपवाद आहे. या गावातली ३५0 एकर क्षेत्रातील बागायतीला ३६५ दिवस २४ तास पाणी मिळतं. या गावात ५०० वर्षांपूर्वीच पाण्याचे असे नियोजन करण्यात आले आहे की, आताच्या घडीलाही गावाला ग्रॅव्हिटीच्या आधाराने पुरेपूर पाणी मिळत आहे.
दापोली तालुक्यातील आसूद गाव म्हणजे नारळी, पोफळीने बहरलेले गाव! शेतकऱ्यांनी फुलवलेल्या नारळी, पोफळीच्या बागांमुळे ‘आसूद बाग’ या नावाने हे गाव ओळखले जाते. निसर्गाच्या कुशीत डोंगर - दऱ्यांच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या गावाला धर्तीवरील स्वर्ग म्हणूनही संबोधले जाते. कोकणातील प्राचीन बागांचा उत्कृष्टनमुना या गावात पाहायला मिळतो. या गावातील बागायतदार शेतकऱ्यांनी वर्षाचे ३६५ दिवस २४ तास प्रत्येक मिनिटासाठी पाणी नियोजन करून लोकसहभागातून नदीवर बंधारा बांधला व गॅ्रव्हिटीने पाटाचे पाणी आणून बागा फुलविल्या आहेत. या गावाची ५०० वर्षांची परंपरा पुढील पिढीकडे हस्तांतरीत केली जात आहे. राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना या गावातील शेतकऱ्यांनी योग्य नियोजनातून साऱ्यांनाच आदर्श घालून दिला आहे.
कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद होते. मात्र धो-धो पडणारे पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा काहीही विनियोग होत नाही. त्यामुळे सर्वाधिक पाऊस पडूनही कोेकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहायला मिळते. दरवर्षी अनेक गावे, वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अशा प्रकारचे चित्र कोकणात पाहायला मिळत आहे. आसूद गाव मात्र याला अपवाद आहे, असेच म्हणावे लागेल. वणंद आणि आसूद या दोन्ही गावांच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नदीवर बंधारा घालून दोन किलोमीटरवरून पाटाचे पाणी आणले जाते. या पाण्याने साडेतीनशे एकर नारळी, पोफळीच्या बागेला पाटाचे पाणी देण्याची प्रथा ५०० वर्षांपूर्वीपासून चालत आली आहे. बारमाही वाहणाऱ्या नदीवरील पाण्याचे योग्य नियोजन केल्याने बागेला पाणी मिळतेच, त्याचबरोबर पिण्याच्या पाणीटंचाईवरही मात केली आहे. हे पाणी स्वच्छ झऱ्याचे, वाहाते, असल्याने पाटाच्या पाण्याचा पिण्यासाठीसुद्धा वापर केला जात आहे.
पाणी नियोजनातून प्रत्येक बागेला चार दिवसआड पाटाचे पाणी मिळत आहे. मार्च, एप्रिल महिन्यात हेच पाणी ८ ते १२ दिवसांनी एकदा मिळते. मे महिन्यात १२ ते १५ दिवसातून एकदा पाणी मिळते. परंतु पाणीटंचाई जाणवत नाही. बागेचे उत्पन्नसुद्धा चांगल्या प्रकारे मिळते. ६० बागायतदार शेतकऱ्यांनी मिळून साडेतीनशे एकर बागायती क्षेत्र पाटाच्या पाण्याने ओलिताखाली आणले आहे. ग्रॅव्हिटीचे पाणी असल्यामुळे विजेची गरज नाही, त्यामुळे वीजबिलाचा भारही शेतकऱ्यावर पडत नाही.
- राजू देपोलकर, बागायतदार
कोकणातील शेतकरी बागायती परवडत नाहीत. म्हणून शेती बंद करायच्या मार्गावर आहेत. मजुरांची वाढती समस्या आहे. कोकणातील शेती पाडून ठेवून मुंबईला चाकरमानी म्हणून जाण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल आहे. परंतु या गावातील बागायतदार स्वत: मेहनत करुन बागा सांभाळतात. बागेत स्वत: मेहनत केल्यामुळे मजुरांचा प्रश्न भेडसावत नाही.
- विनोद देपोलकर, बागायदार
या गावातील प्राचीन मंदिर केशवराज व व्याघ्रेश्वर यामुळे या गावाला प्राचीन इतिहाससुद्धा लाभलेला आहे. या गावातील प्राचीन इतिहास व निसर्गसौंदर्य, नारळी, पोफळीच्या फुललेल्या बागा यामुळे या गावाला पर्यटनात विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र शासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. परंतु या गावाने जलयुक्त शिवारचे महत्व पाचशे वर्षांपूर्वीच ओळखले होते.
या गावातील शेतकरी, शेतमजूर यांना १२ महिने बागायतीतून काम मिळत असून, बागेतून चांगले उत्पन्न मिळत असल्याचा दावा बागायतदार शेतकऱ्यांनी केला आहे.
डोंगर उताराच्या जागेत नारळ - सुपारी लागवड करुन उत्पन्न घेण्याची किमया या गावातील शेतकऱ्यांनी साधली आहे.