साडेतीन लाख रुपये अनुदानाचे वाटप
By Admin | Updated: October 21, 2014 23:42 IST2014-10-21T21:28:46+5:302014-10-21T23:42:54+5:30
जननी सुरक्षा योजना : खेडमध्ये ३५२ मातांना लाभ

साडेतीन लाख रुपये अनुदानाचे वाटप
खेड : माता मृत्यू आणि अर्भक मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याच्या विशेष उद्देशाने सरकारने सुरू केलल्या जननी सुरक्षा योजनेचा लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. खेडमध्ये ३५२ मातांनी या योजनेचा लाभ घेतला असून याकरीता ३ लाख ५४ हजार ४०० रूपयांचे अनुदान वाटप करण्यत आले आहे़ येथील आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे़
दारिद्र्यरेषेखालील व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये होणाऱ्या प्रसुतींचे प्रमाण वाढविणे हा देखील यामागे सरकारचा उद्देश आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील मातांची प्रसुती शासकीय किंवा खाजगी रूग्णालयात झाल्यास त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो़ खेड तालुक्यातील ८ प्राथमिक केंद्रामध्ये हा लाभ दिला गेला आहे.
विशेषत: तळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ५२, कोरेगाव केंद्रामध्ये ४९, वावे ३४, फुरूस ४९, आंबवली ४२, लोटे ५४, शिव बुद्रूक २६, तिसंगी ४५ आणि पर्शुराम रूग्णालयात १ अशा प्रमाणात या मातांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ग्रामीण भागातील रूग्णालयात प्रसुत झालेल्या मातांना ७०० रूपये आणि शस्त्रक्रिया झालेल्यांना २ हजार २०० रूपये धनादेशाव्दारे दिले जातात़
शहरी भागातील रूग्णालयात प्रसूत झालेल्यांना ६०० रूपये आणि शस्त्रक्रिया झालेल्यांना २१०० रूपये दिले जातात़ आरोग्य विभागाने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे़ (प्रतिनिधी)