रत्नागिरीत ३० विद्यार्थी अतिरिक्त
By Admin | Updated: July 23, 2014 21:53 IST2014-07-23T21:51:32+5:302014-07-23T21:53:41+5:30
अकरावी प्रवेश : विद्यार्थ्यांचा विशिष्ट महाविद्यालयांकडे ओढा

रत्नागिरीत ३० विद्यार्थी अतिरिक्त
रत्नागिरी : विशिष्ट महाविद्यालयातच प्रवेश मिळावा, यासाठी अनेक विद्यार्थी व पालकांचा ओढा असल्यामुळे रत्नागिरी शहरातील ३० विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. विद्यार्थी व पालक प्रवेशासाठी महाविद्यालयाचे उंबरठे झिजवत असल्याचे दिसून येत आहेत.
जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी २७ हजार ८७७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी २६ हजार ५२३ विद्यार्थी पास झाले होते. जिल्ह्यात ३८६ माध्यमिक शाळा आहेत. स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालये ४, वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न ६, तर माध्यमिक शाळांशी संलग्न १०९ मिळून जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ११९ इतकी आहे. याशिवाय चालू शैक्षणिक वर्षात स्वयंअर्थसहाय्यित नवीन आठ महाविद्यालये सुरू झाली आहेत.
जिल्ह्यात कला शाखेच्या एकूण ८० तुकड्या असून, ६ हजार ६०० विद्यार्थीसंख्या आहे. वाणिज्य शाखेच्या ८३ तुकड्या असून, ५ हजार ३८० विद्यार्थीसंख्या आहे.
विज्ञान शाखेच्या ७८ तुकड्या असून, ६ हजार ४६० विद्यार्थीसंख्या आहे. संयुक्त शाखेच्या ४१ तुकड्या असून, ३ हजार ३०० विद्यार्थीसंख्या आहे. जिल्ह्यात एकूण २८२ तुकड्या असून, २१ हजार ७४० विद्यार्थीसंख्या आहे. ४७८३ विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, रत्नागिरी शहरवगळता जिल्ह्यातील अन्य महाविद्यालयांतील प्रवेश प्रश्न मार्गी लागला असून, अकरावीचे वर्ग सुरू झाले आहेत.
रत्नागिरी शहरातील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, फाटक प्रशाला, पटवर्धन कनिष्ठ महाविद्यालय, नवनिर्माण महाविद्यालय व नाईक कनिष्ठ महाविद्यालयातून कला शाखेमध्ये ७३६, विज्ञान शाखेमध्ये ८६३, तर वाणिज्य शाखेमध्ये ८१६ विद्यार्थ्यांचा प्रवेश पूर्ण झाला आहे. अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे ३० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.
विज्ञान शाखकडे ओढा जास्त असल्याने या ठिकाणी विद्यार्थी अतिरिक्त ठरण्याची भीती असते. त्याचप्रमाणे सर्वच विद्यार्थ्यांचा ठराविक महाविद्यालयाकडेच ओढा असल्याने त्याठिकाणीही विद्यार्थी अतिरिक्त ठरतात. काही विद्यार्थ्यांनी दुसरा कोणताच पर्याय ठेवलेला नसल्याने आयत्यावेळी एखाद्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, तर त्यांना अन्य महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकत नाही आणि वर्ष वाया जाण्याचीही भीती निर्माण होते. (प्रतिनिधी)