जिल्ह्यात २,९०८ बालकांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST2021-06-29T04:22:10+5:302021-06-29T04:22:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच जिल्ह्यात २,९०८ लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. ही ...

जिल्ह्यात २,९०८ बालकांना कोरोनाची लागण
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच जिल्ह्यात २,९०८ लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. ही आकडेवारी शून्य ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आहे. या सर्वच कोरोनाबाधित बालकांवर उपचार करुन त्यांना बरे करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे़ जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात बालके बाधित हाेत असून, सर्वाधिक बाधित हाेण्याचे प्रमाण रत्नागिरी तालुक्यात ८३४ इतके आहे.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट मार्चपासून सुरु झाली. मात्र, या दुसऱ्या लाटेत एप्रिल आणि मे महिन्यामध्ये बाधित रुग्णांची संख्या जास्त होती. एप्रिलमध्ये ११,२५४ बाधित, २८० मृत्यू तर मे महिन्यात बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्यांची संख्या १४,१५६ तर ५८३ बाधितांचा मृत्यू होता. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेचीही धावपळ उडाली होती.
जागतिक आरोग्य संघटना, केंद्र शासन तसेच साथरोग तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त प्रमाणात बाधा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने खबरदारीचा उपाय म्हणून आतापासून तयारी सुरु केली आहे. महिला रुग्णालयानंतर आता जिल्हा क्रीडा संकुलात बालकांसाठी कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक बेड, ऑक्सिजन बेड, लहान मुलांचे आयसीयू तसेच व्हेंटिलेटर बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत.
-----------------------------------
जिल्ह्यात एप्रिल, मे महिन्यातील बाधित बालके
तालुका ० ते १८ वर्षे वयोगटातील बाधित बालके
मंडणगड ३०
दापोली १७८
खेड २१९
गुहागर २६१
चिपळूण ५५७
संगमेश्वर ४२६
रत्नागिरी ८३४
लांजा १८६
राजापूर २१७
एकूण--------- २,९०८
---------
जिल्ह्यात कोरोनाची लागण एप्रिल, २०२०मध्ये रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील एका सहा महिन्याच्या बालकाला झाली होती. तो जिल्ह्यातील कोरोनाबाधित पहिला बालक होता. जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ दिवंगत डॉ. दिलीप मोरे यांनी त्या बाळावर उपचार केल्यानंतर ते बाळ बरे होऊन सुखरुप घरी परतले होते.
-----------
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात २०२१ जानेवारी अखेरीस प्रसुतीकरिता आलेल्या ५ गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्या पाचपैकी २ महिलांची प्रसुती झाल्यानंतर नवजात बालकांना कोरोनाची लागण झाली होती. या दोन्ही बालकांना जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयु (बालकांचा अतिदक्षता विभाग) येथे उपचाराकरिता ठेवण्यात आले होते. ती दोन्ही बालके कोरोनामुक्त होऊन आईसह सुखरुप घरी परतली होती.