चिपळुणातील ३७३ पैकी २२ पाणी नमुने दूषित
By Admin | Updated: September 25, 2014 00:19 IST2014-09-24T22:45:20+5:302014-09-25T00:19:17+5:30
आरोग्य विभाग : आॅगस्ट महिन्यात पाणीप्रदूषणाचे प्रमाण कमी

चिपळुणातील ३७३ पैकी २२ पाणी नमुने दूषित
अडरे : चिपळूण तालुक्यातील कामथे प्रयोगशाळेत तपासलेल्या ३७३ पाणी नमुन्यांपैकी २२ नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. जुलै महिन्यात ४१० नमुने तपासले होते. त्यापैकी ३७ नमुने दूषित ठरले होते. आॅगस्ट महिन्यात ६ टक्के पाणी नमुने दूषित असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.
आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ग्रामीण भागातील पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने तपासले जातात. आॅगस्ट महिन्यात चिपळूण तालुक्यातील ३७३ नमुने घेऊन कामथे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये २२ ठिकाणांचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले आहे.
आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक कर्मचारी हे पाणी पुरवठा करणाऱ्या साधनांमधून पाण्याचे नमुने गोळा करतात. यामध्ये सार्वजनिक विहीर, तलाव, बोअरवेल, पाण्याची टाकी, नळपाणी पुरवठा करणारे नळ याचा समावेश असतो. ग्रामीण भागातील दूषित पाण्यामुळे अनेक आजार होतात. त्यासाठी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पाणी शुद्धिकरणावर भर दिला जातो.
प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत शिरगाव ३७ व रामपूर येथील २६ पाणी नमुने घेण्यात आले. दोन्ही केंद्राच्या हद्दीतील गावामध्ये एकही पाणी नमुना दूषित नाही. अडरेमध्ये ४० नमुने घेण्यात आले. त्यातील नवीन कोळकेवाडीमध्ये १ दूषित, दादरमध्ये ४१ पैकी ४ नमुने दूषित आढळले. त्यामध्ये ओवळी बौद्धवाडी, कादवड फणसवाडी, तिवरे बेंदवाडी व फणसवाडी, खरवतेमध्ये ४० नमुने त्यापैकी ३ नमुने दूषित आढळले. त्यामध्ये मालघर तेलेवाडी, कुंभारवाडी, तेलेवाडी सार्वजनिक विहीर, वहाळमध्ये ४७ नमुने घेतले. त्यापैकी ५ दूषित असून, त्यामध्ये पिलवली वाकडेवाडी, तोंडली सडेवाडी, आबिटगाव वहाळकरवाडी, खांडोत्री सहाणवाडी व मूर्तवडे सुतारवाडी या वाड्यांचा समावेश आहे.
फुरुसमध्ये ३४ पैकी कुटरे वरचीपेठ, चिंचवाडी येथील दोन नमुने दूषित आढळले. खापरेमध्ये ३४ पैकी ३ नमुने दूषित असून, यामध्ये बिवली गवळवाडी, भोम वरचीवाडी, कालुस्ते खुर्द नवानगर आदी ठिकाणांचे पिण्याचे पाणी दूषित असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन स्पष्ट झाले.
ज्या ठिकाणी दूषित पाण्याचे प्रमाण आहे, अशा ग्रामपंचायतींनी दुबार शुद्धिकरण करावे, अशी सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहेत. (वार्ताहर)