२२ कर्मचारी, अधिकाऱ्यांचे निलंबन
By Admin | Updated: January 16, 2015 23:42 IST2015-01-16T23:28:33+5:302015-01-16T23:42:54+5:30
जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती

२२ कर्मचारी, अधिकाऱ्यांचे निलंबन
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या कामकाजामध्ये शिस्त यावी, यासाठी वर्षभरात २२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली गेली. त्यामध्ये ७ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस आरोग्य विभागाकडे केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले.काळम-पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारल्यावर, एक वर्षाचा कालावधी उद्या दि़ १७ जानेवारी रोजी पूर्ण होत असल्याने, आपल्या कार्याची माहिती काळम-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली़ ते म्हणाले, आपण एकाही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यावर जाणीवपूर्वक कारवाई केलेली नसून, जिल्हा परिषदेच्या कामकाजामध्ये शिस्त यावी, यासाठीच कारवाईचा बडगा उगारावा लागला़ त्यामुळे काही वेळा अनेकांचा दबावही आला़ मात्र, आपण त्याला न जुमानता कारवाई केली़ यापुढेही शिस्तभंग आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला़ त्याचवेळी चांगले काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे कौतुकही केले आहे़ शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह कर्मचारी संघटनेलाही वारंवार माहिती देण्यात आली आहे़ त्यामुळे एकदा घेतलेला निर्णय आपण कधीही बदललेला नाही़ निर्णय बदलणे म्हणजे कमकुवतपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले़
एक वर्षाच्या कालावधीत २२ कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली़ त्यामध्ये ७ वैद्यकीय व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे़ डॉ़ बी़ बी़ गाढवे (तालुका आरोग्य अधिकारी, चिपळूण), डॉ़ आऱ बी़ सोनवणे (वैद्यकीय अधिकारी, धारतळे, राजापूर), डॉ़ एस़ बी़ बचुटे (वैद्यकीय अधिकारी, फुरुस, चिपळूण) या तिघांवर निलंबनाची कारवाई केली. डॉ़ एस़ वाय़ यादव (वैद्यकीय अधिकारी, कोतवडे, रत्नागिरी) यांच्यावर बदलीची, डॉ़ एस़ बी़ घोगरे (वैद्यकीय अधिकारी, रामपूर, ता़ चिपळूण) यांच्यावर शिस्तभंगाची, डॉ़ एस़ आऱ पाचलेगावकर (वैद्यकीय अधिकारी, कोरेगाव़, ता़ खेड) आणि डॉ़ एऩ एल़ धुमाळ (वैद्यकीय अधिकारी, वावे, ता़ खेड) यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे करण्यात आली आहे. इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांनी धडा घ्यावा, असेही यावेळी स्पष्ट केले़ वस्तीशाळा निमशिक्षकांचाही प्रश्न सोडवण्यात यश आले़ जन्म-मृत्यू नोंदीच्या कामांना गती देऊन कामे केल्याचे त्यांनी सांगितले़ (वार्ताहर)