तीन महिन्यात २० हजार युनिट

By Admin | Updated: March 16, 2016 08:29 IST2016-03-16T08:25:30+5:302016-03-16T08:29:50+5:30

नागझरीतील शेतकऱ्याला भुर्दंड : महावितरणचा मीटर तपासणी ‘ओके’

20 thousand units in three months | तीन महिन्यात २० हजार युनिट

तीन महिन्यात २० हजार युनिट

असगोली : शेतीच्या पंपाचे तीन महिन्याचे तब्बल २० हजार युनिट दाखविण्यात आले असून, बिल १७,५६१ रुपये आले आहे. या मीटरच्या तपासणीसाठी ५०० रुपये शुल्क भरून घेण्यात आले. त्यानंतर मीटर तपासणीचा अहवाल ‘ओके’ आल्याने गुहागर तालुक्यातील नागझरी येथील शेतकरी प्रकाश मांडवकर यांनी या महावितरण कंपनीच्या करभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले. आपले कोणत्याही प्रकारचे म्हणणे ऐकून न घेता मीटर कनेक्शन काढून टाकले आणि जबरदस्तीने आपल्याला महावितरण कंपनीने पैसे भरावयास लावले, असा दावा त्यांनी केला आहे.
प्रकाश मांडवकर यांनी एप्रिल २००९ साली सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शेती आणि नारळी - पोफळीच्या बागायतींसाठी विद्युत शेतीपंप कनेक्शन घेतले होते. ३ एचपीचा शेतीपंप आहे. नवीन मीटरचे पैसे भरुनसुद्धा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जुना मीटर बसवून दिला. त्यानंतर युनिटचे कोणत्याही प्रकारचे रिडिंग न घेता महावितरण कंपनीने ३० आॅक्टोबर २००९ साली ११० रुपये इतके पहिले बिल दिले होते. त्यानंतर चार वर्षांनी मार्च २०१३ रोजी ४७० रुपयांचे बिल दिले. त्यावेळीही रिडिंग घेतले नव्हते. त्यानंतर जानेवारी २०१४मध्ये ६०० रुपयांचे बिल दिले, तेही कोणतेही रिडिंग न घेता. ही सर्व बिले शेतकरी प्रकाश मांडवकर यांनी वेळेत त्यांच्या खात्यामध्ये भरली आहेत. याबाबत वारंवार चौकशी करुनसुद्धा तीन महिन्यांनी त्यांना मीटरचे योग्य रिडिंग घेऊन बिले देण्यात आली नाहीत. त्यानंतर दिनांक २१ जानेवारी २०१६ रोजी १७,५६० रुपये एवढ्या रकमेचे बिल दिले. यावेळी मात्र त्यांनी मीटर रिडिंग घेतले होते. तब्बल दोन वर्षांनी बिल दिले. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार मीटर बिल हे सरासरी तीन महिन्यांचे ११० युनिट आहे. मात्र, सप्टेंबर २०१५ मध्ये ६० युनिट दाखवत असताना तेच डिसेंबर २०१५ मध्ये २०,०१५ एवढे युनिट झाले. त्यामुळे १७,५६१ रुपये एवढी रक्कम भरण्यास सांगितल्याने शेतकऱ्याला मानसिक त्रास होत आहे. ऐनवेळी एवढी रक्कम कुठून आणणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे. (वार्ताहर)

आधी पैसे भरा : रिडिंगनुसारच बिल दिल्याची माहिती
गुहागर येथील महावितरण कंपनीचे मुख्य अधिकारी जाधव यांनी आम्ही मिळालेल्या रिडिंगनुसारच बिल दिले आहे. तुम्हाला वरिष्ठांकडे तक्रार करायची असेल तर करू शकता. आधी पैसे भरा, मगच मीटर बसेल, अशा शब्दात त्या शेतकऱ्यांना उत्तर दिल्याने मुलांप्रमाणे कष्टाने वाढवलेली आणि नव्याने उत्पन्न देणारी नारळी, पोफळींची बाग सुकून जावू नये म्हणून त्यांनी कर्जाने पैसे काढून ६० टक्के म्हणजे ६,४१० रुपये रक्कम भरली आणि मग मीटर लावून देण्याचे काम महावितरणने केले. यापुढील रक्कम तत्काळ भरण्याची ताकीदही त्या शेतकऱ्याला देण्यात आली आहे.

नवीन मीटर दिला...
ज्या मीटरबाबत मांडवकर यांच्याकडून तपासणीसाठी ५०० रुपये भरुन घेतले तो मीटर त्या ठिकाणी न लावता त्यांना नवीन मीटर देण्याचे काम महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले असल्याचे मांडवकर यांनी सांगितले. मात्र, जुना मीटर तपासणी अहवाल ‘ओके’ असल्याचा दाखला त्यांना देण्यात आला आहे.

Web Title: 20 thousand units in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.