लांजात २0 लाखांचे अवैध लाकूड जप्त
By Admin | Updated: November 25, 2015 00:32 IST2015-11-25T00:19:44+5:302015-11-25T00:32:40+5:30
चोरटी लाकूड वाहतूक करणाऱ्या एका इसमाला ट्रकसह अटक

लांजात २0 लाखांचे अवैध लाकूड जप्त
लांजा : लांजा तालुक्यातील भांबेड येथे वन विभागाच्या पथकाने सपळा रचून चोरटी लाकूड वाहतूक करणाऱ्या एका इसमाला ट्रकसह अटक केली. त्याच्याकडून लाकूड व ट्रक असा एकूण २० लाख रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे.
लांजा तालुक्यात वृक्षतोड चालू होती. त्याला आळा घालण्यासाठी लांजा वन विभागाने रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ केली होती. येथील लाकूडसाठा हलवण्यासाठी कोल्हापूर येथून काही गाड्या भांबेडमार्गे हर्दखळे अशी रात्रीची चोरटी वाहतूक होत असल्याची खबर वन विभागाला मिळाली होती.
लांजा वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी हर्दखळे-भांबेडमार्गे लाकडाची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच वनपाल व्ही. वाय. गुरवळ, वनरक्षक पाटील, वनमजूर खेडेकर यानी भांबेडच्या श्री महालक्ष्मी मंदिरापाशी सापळा रचला होता. रात्री १० वाजता हर्दखळे अवैधरित्या लाकूड भरून येणारा ट्रक (एमएच ११/एम-६२७६) थांबवण्यासाठी हात केला असता तो ट्रक न थांबता फिल्मीस्टाईलने पळवण्यात आला.
वन विभाग कर्मचाऱ्यांनी तत्काळ आपल्या गाडीने पाठलाग करून भांबेडमार्गे कोल्हापूर रस्त्यावर त्या ट्रकला अडवले. वन विभागाने ट्रकचालक बाबू जनार्दन चौधरी (कोपार्दे, करवीर, जिल्हा कोल्हापूर) याला लाकूड व ट्रकसह ताब्यात घेण्यात आले. (प्रतिनिधी)