चिपळूणमध्ये १९ गावे दरडग्रस्त
By Admin | Updated: July 25, 2014 22:17 IST2014-07-25T20:53:43+5:302014-07-25T22:17:35+5:30
१५ दिवसांपासून पावसाचा जोर

चिपळूणमध्ये १९ गावे दरडग्रस्त
चिपळूण : तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे दरडी कोसळल्याने १९ गावांतील अनेक घरांना धोका होऊ शकतो. यासाठी सतर्क राहण्याची सूचना तहसीलदार वृषाली पाटील यांनी सरपंचांना पत्राद्वारे दिली आहे.
जुलै २००५मध्ये अतिवृष्टी झाली आणि तिवरे, तळसर मुंढे, तळवडे आदी भागात दरडी कोसळून मोठी हानी झाली होती. त्यामुळे आजही हा धोका कायम आहे. तालुक्यातील मालदोली, बिवली, करंबवणे, केतकी, कालुस्ते, वीर, अनारी, अडरे, कोंडफणसवणे, पोफळी, भिले, कोळकेवाडी, शिरगाव, तिवरे, मुंढेतर्फ चिपळूण, पिंपळी बुद्रुक, कुंभार्ली, नगावे येथील घरांना दरडीचा धोका आहे. त्यामुळे सरपंचांनी आवश्यक ती उपाययोजना करावी, यासाठी तहसीलदार पाटील यांनी पत्र दिले आहे.
पावसामुळे एखाद्या भागात दरड कोसळून अपघात होऊ शकतो, अशी स्थिती उद्भवल्यास सुरक्षिततेबाबत काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. सध्या पावसाचे प्रमाण वाढले असल्याने धोका वाढला आहे. गेल्या पंधरा दिवसात पडलेल्या पावसामुळे १९ गावातील अनेक घरांना धोका पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)