देवरूख : तालुक्यात १८ कोरोना लसीकरण केंद्र जनतेच्या सेवेत असून, या केंद्रांच्या माध्यमातून १८,६५८ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
संगमेश्वर तालुक्यात सध्या दोन ग्रामीण रूग्णालये, ११ प्राथमिक आरोग्य केंद्र व ५ उपकेंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू आहे. प्रारंभी लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये भीती असल्याने नागरिकांनी लस घेण्याकडे कानाडोळा केला. मात्र, गत दोन महिन्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत होणारी झपाट्याने वाढ यामुळे जनता भयभीत झाली असून, लसीकरणाचे महत्त्व पटू लागले आहे. परिणामी लसीकरण केंद्रावर गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
तालुक्यात कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ४ हजार ५९८, तर दुसरा डोस ३४० जणांना देण्यात आला आहे. कोविशिल्डचा पहिला डोस ११ हजार ३६९, तर दुसरा डोस २ हजार ३४५ जणांना देण्यात आला आहे. तालुक्यात १८ ठिकाणी लसीकरण सुरू आहे. यामध्ये वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात ८७९, कोंड उमरे केंद्रात ९२८, फुणगूस केंद्रात ९०९, मांजरे उपकेंद्रात १५४, धामापूर केंद्रात ७५०, पूर उपकेंद्रात १००, तुळसणी उपकेंद्रात ४५०, बुरंबी केंद्रात १ हजार, साखरपा केंद्रात २ हजार ५६८, ओझरे बुद्रुक उपकेंद्रात १२०, सायले केंद्रात ९५९, कडवई उपकेंद्रात १००, देवळे केंद्रात ८८०, माखजन केंद्रात ९७७, कडवई केंद्रात ९०२, निवे खुर्द केंद्रात ९४०, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात ३ हजार ४४४, तर देवरूख ग्रामीण रुग्णालय केंद्रात २ हजार ५९८ नागरिकांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे.