चाकरमान्यांच्या परतीसाठी आजपासून १६० एसटी बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST2021-09-14T04:37:03+5:302021-09-14T04:37:03+5:30
चिपळूण : गणेशोत्सवासाठी तालुक्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी चिपळूण आगारातर्फे १६० एसटी बसेसचे नियोजन करण्यात ...

चाकरमान्यांच्या परतीसाठी आजपासून १६० एसटी बस
चिपळूण : गणेशोत्सवासाठी तालुक्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी चिपळूण आगारातर्फे १६० एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. १४ सप्टेंबरपासून या बसेस धावणार आहेत.
गणेशोत्सव हा कोकणातील प्रमुख उत्सव असल्याने दरवर्षी मुंबई, पुणेसह विविध शहरांतून हजारोंच्या संख्येने चाकरमानी तालुक्यात दाखल होतात. यावर्षीही खासगी वाहनांसह रेल्वे व एसटी बसेसमधून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी शहरासह ग्रामीण भागात दाखल झाले आहेत. दीड दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर काही चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी रेल्वे बरोबरच एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी दरवर्षी चिपळूण आगारातर्फे एसटी बसेसचे नियोजन केले जाते. यावर्षीही आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी १६० एसटी बसेसचे नियोजन केले असून, त्याचे तिकीट आरक्षणही सुरू झाले आहे. पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर मुंबई, पुणेकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढते. त्या पद्धतीचे नियोजन करण्यात आले असून १४ सप्टेंबरपासून मुंबई, पुणे मार्गावर या बसेस सोडण्यात येणार आहेत.