वर्षभरात १६ हजार मातांना मिळाली सुरक्षेची ऊब

By Admin | Updated: July 10, 2016 01:47 IST2016-07-09T23:20:26+5:302016-07-10T01:47:18+5:30

-माता सुरक्षा --दिन विशेष

16 thousand mothers received boredom in safety during the year | वर्षभरात १६ हजार मातांना मिळाली सुरक्षेची ऊब

वर्षभरात १६ हजार मातांना मिळाली सुरक्षेची ऊब


शोभना कांबळे -- रत्नागिरी
मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील सर्वाेत्कट असा क्षण असतो. पण ते लाभताना स्त्रीला खडतर परिस्थितीतून जावे लागत असते. गर्भारपण आणि प्रसुती दरम्यान झालेल्या गुंतागुंतीमुळे मातांचा मृत्यू होण्याचा धोका असतो, म्हणूनच या भावी मातेची प्रसुती सुलभ व्हावी, तसेच तिला आरोग्यविषयक सुविधा वेळेवर मिळावी, यासाठी शासनातर्फे तिच्या घरापासून रूग्णालयापर्यंत आणण्यासाठी ‘जननी शिशु सुरक्षा’ कार्यक्रमांतर्गत शासकीय वाहनांची (१०२ क्रमांकाची) मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गतवर्षी या योजनेचा लाभ जिल्ह््यातील १६,१७० मातांना मिळाला.
पूर्वी घरच्याघरीच प्रसुती होत असे. मात्र, गुंतागुंतीच्यावेळी वेळेवर औषधोपचार उपलब्ध होत नसल्याने त्या मातेचा किंवा तिच्या अर्भकाचा मृत्यू होत असे. त्यामुळे बाळंतपण काळात होणाऱ्या मातांच्या आणि बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. शहरापेक्षा ग्रामीण भागातून प्रसुतीगृहात आणणे वाहनाच्या अभावी अडचणीचे होत असे. त्यातच आर्थिक परिस्थितीमुळेही तिला सुविधा मिळणे अवघड होत असे. प्रसंगी बाळ - बाळंतीण दगावण्याचाही धोका असे. मात्र, आता आरोग्य विभागाने भावी मातेचे आरोग्य, तिची प्रसुती सुलभ व्हावी आणि तिचे बाळ सुखरूप निपजावे, यासाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. यापैकी एक म्हणजे ‘१०२ क्रमांकाची’ शासकीय वाहनाची सुविधा. ‘जननी शिशु सुरक्षा’ कार्यक्रमांतर्गत शासनातर्फे तिच्या घरापासून रूग्णालयापर्यंत आणण्यासाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शासकीय वाहनाचा आधार जिल्ह््यातील १६,१७० मातांना मिळाला आहे. या सुविधेमुळे आता मातेला प्रसुतीसाठी वेळेवर रूग्णालयात दाखल केल्याने तिची प्रसुती सुलभ होऊ लागली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील गरोदर मातांना या वाहनाचा लाभ मिळू लागला आहे. या वाहनांद्वारे गेल्या वर्षभरात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या ७१५२ मातांना या सुविधेचा लाभ मिळाला आहे. तर एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात नेण्यासाठी २७०९ महिलांना या वाहनांचा आधार मिळाला आहे. तसेच प्रसुतीसाठी घरापासून रूग्णालयापर्यंत जाण्यासाठी तब्बल ६३०९ मातांनी लाभ घेतला आहे.
मातेचा आहार आणि आरोग्य यादृष्टीने तिला आर्थिक आधार देण्याच्या हेतूने ‘जननी सुरक्षा’ योजना सुरू केली आहे. ग्रामीण भागातील मातांना ७०० रूपये आणि शहरी भागातील मातांना ६०० रूपये, अशी आर्थिक मदत देण्यात येते. आरोग्य विभागाच्या या सुविधांमुळे भावी मातांना आणि त्यांच्या बालकांसाठी हे सुरक्षाकवच ठरत आहे.


तसं पाहिलं तर मातेच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाते, हे त्या कुटुंबाच्या आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर अवलंबून असतं. पण पहिलटकरीण असेल तर सासरी आणि माहेरी तिची चांगली काळजी घेतली जाते. मात्र, पहिल्या दोन मुली असतील, तर तिच्याकडे दुर्लक्ष होते. पण आता समाजाचा शैक्षणिक स्तर उंचावलाय. पूर्वी बाळंतपणात अडचण आली तरंच तिला हॉस्पीटलमध्ये आणले जायचे. पण आता अगदी झोपडपट्टीतील महिलाही गर्भारपणात तपासणीसाठी येते. एकंदरीत आता प्रसुतीपूर्व तपासणी आणि काळजी याबाबत सतर्कता आलीय, याचे श्रेय शासनाच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाबरोबरच प्रामुख्याने घरोघरी जाऊन गर्भार मातांमध्ये त्यांच्या आरोग्याची जाणीव निर्माण करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना द्यायला हवे.
- डॉ. मनिषा वंडकर, स्त्री रोग व प्रसुतीतज्ज्ञ, रत्नागिरी

Web Title: 16 thousand mothers received boredom in safety during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.