जिल्ह्यातील १५९ मुले शैक्षणिक प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST2021-03-22T04:28:33+5:302021-03-22T04:28:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाच्या सूचनेनुसार सलग ...

जिल्ह्यातील १५९ मुले शैक्षणिक प्रवाहात
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाच्या सूचनेनुसार सलग दहा दिवस शाळाबाह्य शोधमोहीम प्रत्येक तालुक्यात राबविण्यात आली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या सहकार्याने सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली असताना तीन लाख १३ हजार ८०२ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले, त्याअंतर्गत १५९ मुले शाळेत दाखल झाली आहेत. याशिवाय स्थलांरित ७०१ मुले जिल्ह्यात आली आहेत.
कोरोनामध्ये लॉकडाऊन काळात अन्य जिल्ह्यातून काही कुटुंबे रत्नागिरीत आली, लॉकडाऊन संपल्यानंतर काही कुटुंबांनी मुंबईत परत जाण्याऐवजी गावातच राहण्याचा निर्णय घेतला. परराज्यातील काही कुटुंबे गावाकडे गेली होती, तीही परतली. कामे सुरू असून शहरातील विविध कामांसाठी कामगारांचे तांडे अन्य जिल्ह्यांतून आले आहेत.
तीन लाख कुटुंबांचे सर्वेक्षण
जिल्ह्यातील तीन लाख १३ हजार ८०२ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये १५९ मुले शाळाबाह्य आढळली असून ८८ मुले व ७१ मुलींचा समावेश आहे. शिवाय २४ दिव्यांग मुले आहेत. जिल्ह्यात ७०१ मुले स्थलांतरित होऊन आली असून ३५८ मुले, ३४३ मुली आहेत. त्यामध्ये विशेष गरजा असलेल्या १५ मुलांचा समावेश आहे.
१०८ कुंटुंबे स्थलांतरित
शहरात व आसपासच्या गावात परजिल्ह्यातील कामगारांचे तांडे कामानिमित्त येत असतात. मात्र कामे संपल्यानंतर तांडे अन्यत्र निघून जातात. अशा तांड्यांचेही सर्वेक्षण करण्यात आले असता, तांड्यातील १०८ मुले परजिल्ह्यात परतली आहेत. त्यामध्ये ५६ मुलगे व ५२ मुलींचा समावेश आहे. विशेष गरजा असलेले एकमेव मूल होते.
चिपळूण तालुक्यात सर्वाधिक मुले
सर्वेक्षणांतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले चिपळूण तालुक्यात सापडली आहेत. सर्वात कमी संख्या गुहागर व संगमेश्वर तालुक्यात आहे. रत्नागिरी तालुक्यातील शाळाबाह्य मुले शून्य असली तरी नगर परिषदेच्या हद्दीत १८ मुले सापडली आहेत. शाळाबाह्य मुलांमध्ये मुलग्यांची संख्या अधिक असून मुलींची संख्या तुलनेने कमी आहे. सर्व मुलांना शैक्षणिक प्रवाहात दाखल करून घेण्यात आले आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाच्या सूचनेनुसार शाळाबाह्य सर्वेक्षण मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली. त्यामध्ये १५९ मुले शाळेत दाखल झाली असून स्थलांतरित ७०१ मुले जिल्ह्यात आली आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या सहकार्याने सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.
- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी