गणेशोत्सवासाठी आजपासून कोकणात येणार १५८५ जादा गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST2021-09-05T04:35:58+5:302021-09-05T04:35:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे. जिल्ह्यात दीड लाख गणेशमूर्तींची ...

1585 extra trains will arrive in Konkan from today for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी आजपासून कोकणात येणार १५८५ जादा गाड्या

गणेशोत्सवासाठी आजपासून कोकणात येणार १५८५ जादा गाड्या

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे. जिल्ह्यात दीड लाख गणेशमूर्तींची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात येते. नोकरी-व्यवसायासाठी परजिल्ह्यात स्थायिक असलेले मुंबईकर गावी येत असल्याने कोकणात १५८५ जादा गाड्या येणार आहेत. दि. ५ सप्टेंबरपासून कोकणात जादा गाड्यातून मुंबईकरांचे आगमन होणार आहे.

दरवर्षी कोकणात जादा गाड्या मुंबई व उपनगरातून सोडण्यात येतात. गतवर्षी कोरोनामुळे मार्चमध्ये लॉकडाऊन झाले असताना अनेक मुंबईकर गावी आले होते. त्यामुळे गतवर्षी जिल्ह्यातील अवघ्या २९५ जादा गाड्या आल्या होत्या. कोरोनामुळे आलेल्या गाड्या थेट कोरोना चाचणी केंद्रावर नेण्यात येत होत्या. चाचणी केल्यानंतर मुंबईकरांना विलगीकरण केंद्रावर ठेवण्यात आले होते. विलगीकरण सक्तीचे असल्याने गतवर्षी मुंबईकरांचा फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. मात्र, यावर्षी शासकीय निर्बंध शिथिल करण्यात आल्याने गाड्यांची संख्या वाढली आहे.

रायगड जिल्ह्यात २५४, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५७, रत्नागिरी जिल्ह्यात ११७४ जादा गाड्या येणार आहेत. सर्वाधिक जादा गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात असून, चिपळूण व गुहागर तालुक्यात येणार आहेत. दि. ५ ते १० सप्टेंबरपर्यंत गाड्या कोकणात येणार आहेत. मंडणगड तालुक्यात ५४, दापोली ११७, खेड ११४, चिपळूण २६३, गुहागर २६८, देवरूख ८७, रत्नागिरी १४३, लांजा ७३, राजापूर तालुक्यात ५५ जादा गाड्या येणार आहेत. परतीसाठी गौरी गणपती विसर्जनापासून (दि. १४) जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत १११० गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. ऑनलाइन आरक्षण उपलब्ध करण्यात आले.

--------------------

गणेशोत्सवासाठी जादा गाड्या येणार असल्याने रत्नागिरी विभागातर्फे दुरुस्तीपथके, गस्तीपथके, क्रेनची उपलब्धता केली जाणार आहे. कशेडी ते चिपळूण, संगमेश्वर ते हातखंबा व हातखंबा ते राजापूर मार्गावर तीन गस्ती पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. खेड, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा या चार ठिकाणी दुरुस्ती पथके उपलब्ध केली जाणार आहेत. शिवाय चिपळूण येथे क्रेन ठेवण्यात येणार आहे. अद्यावत ब्रेक व्हॅन विभागात तीन असून, महामार्गावर तैनात ठेवली जाणार आहेत. पैकी भरणानाका, चिपळूण, हातखंबा तिठा येथे ब्रेक डाऊन व्हॅन उपलब्ध असणार आहेत, तर संगमेश्वर आगारात दुरुस्तीपथक उपलब्ध केले जाणार आहे. जिल्ह्यात दि. ५ सप्टेंबरपासून दि. ९ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ————————-

गणेशभक्तांच्या स्वागतासाठी रत्नागिरी विभाग सज्ज झाला आहे. रविवारी सात गाड्या येणार आहेत. दि. ८ रोजी ३०६, तर दि. ९ रोजी सर्वाधिक १०७३ गाड्या येणार आहेत. मंडणगड ते राजापूर आगारात जादा गाड्या दाखल होणार असून, प्रत्येक आगाराला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

Web Title: 1585 extra trains will arrive in Konkan from today for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.