१४,७४२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
By Admin | Updated: February 11, 2016 23:46 IST2016-02-11T22:28:12+5:302016-02-11T23:46:30+5:30
आम आदमी : महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा पाचव्या क्रमांकावर

१४,७४२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
शोभना कांबळे -- रत्नागिरी --आम आदमी विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील १४,७४२ विद्यार्थ्यांना मिळाला आहे. अवघ्या चार महिन्यात एवढ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणारा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर आहे.ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे निधन झाले तर त्या कुटुंबावर आर्थिक कुऱ्हाड कोसळते. अशा कुटुंबाला आधार मिळावा, या हेतूने शासनाने कर्त्या व्यक्तिला विम्याचे संरक्षण देण्यासाठी ‘आम आदमी विमा योजना’ २ आॅक्टोबर २००७ पासून अस्तित्त्वात आणली आहे. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील रोजगार करणाऱ्या कुटुंबप्रमुखाला ही योजना लागू करता येते. साधारणत: २०१३ सालापासून जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभार्थ्याचे अपघाती निधन झाले तर त्याच्या कुटुंबाला ७५,००० रुपये अर्थसहाय शासनाकडून केले जाते. नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३०,००० रुपये अर्थसहाय केले जाते. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे, दोन्ही पाय निकामी झाल्यास ७५,००० रूपये, तर एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास ३७,५०० रुपये अर्थसहाय शासनाकडून करण्यात येते.तसेच अशा लाभार्थीच्या ९ ते १२वी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना प्रति तिमाही ३०० रुपये इतकी शैक्षणिक मदतीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. जिल्ह्यात आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी १ लाख ६३ हजार २०० हतकी असून १,२१,४९३ इतकी पुरूषांची, तर ४७,७०७ इतकी महिलांची संख्या आहे. आम आदमी विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचे अर्जही आॅनलाईन भरण्यात आले होते. त्यामुळे अनेक समस्यांना शाळांना सामोरे जावे लागले होते. तरीही यावर्षी उशिरा अर्ज येऊनही तब्बल १४,७४२ विद्यार्थ्यांच्या खात्यावर ही शिष्यवृत्ती जमा झाली आहे. या योजनेचा लाभ देणारा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे.
अवघ्या चार महिन्यात मिळाला लाभ
कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास शासनाकडून मिळतो आम आदमी विमा योजनेचा लाभ.
२ आॅक्टोबर २००७पासून योजना अंमलात.
भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील रोजगार करणाऱ्या कुटुंबप्रमुखाला योजना लागू करता येते.
यावर्षी उशिरा अर्ज येऊनही तब्बल १४ हजार ७४२ विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा.