मँगोनेटमध्ये १,४६० बागायतदार
By Admin | Updated: February 13, 2015 22:54 IST2015-02-13T22:24:01+5:302015-02-13T22:54:55+5:30
निर्यात वाढणार : युरोपीय देशांनी आंबा आयातीवरील बंदी उठवली...

मँगोनेटमध्ये १,४६० बागायतदार
रत्नागिरी : फळमाशीचे कारण देत गतवर्षी युरोपीय देशांनी आंबा नाकारला होता. मात्र, काही अटी शिथील करून युरोपीय देशांनी यावर्षी आंबा आयातीवरील बंदी उठविली आहे. मात्र, शेतकऱ्यांना आंबा परदेशात निर्यात करण्यासाठी कृषी विभागातर्फे मँगोनेटव्दारे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १४६० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. आंबा बागेचा सातबारा व जागेचा नकाशा याव्दारे आॅनलाईन अर्ज भरून मँगोनेटची नोंदणी करण्यात आली आहे. मँगोनेटसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी दि. २० फेब्रुवारी रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यावेळी परदेशात आंबा आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना बोलावण्यात येणार असून, ते मार्गदर्शन करणार आहेत. मँगोनेटची प्रक्रिया कशी असते, बागेची पाहणी झाल्यानंतर फळांचे वर्गीकरण तसेच बागेसाठी वापरण्यात आलेली खते, कीटकनाशके यांची नोंदणी कशा पद्धतीने करावी, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यामध्ये २८ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मँगोनेटसाठी नोंदणी केलेल्या बागेची तपासणी करुन अहवाल तयार करण्यात येणार आहे. संबंधित अहवाल तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना मँगोनेटचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मँगोनेटकडे शेतकऱ्यांचा सध्या वाढता कल असून, दिवसेंदिवस बागांचे क्षेत्र वाढत आहे.
युरोपीय देशांमध्ये आंबा पाठवत असताना त्यावर उष्णजल प्रक्रियाही करण्यात येणार आहे. आंब्यावर एक तास ४८ अंश सेल्सिअस उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात. बैगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशर यांसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे.मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वास्तविक आंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. यासंबंधी तातडीने अहवाल पाठविणे गरजेचे असल्याने विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
युरोपीय देशांनी आंबा आयातीवरील बंदी उठवल्याने बागायतदारांना त्याचा फायदा झाला आहे. निर्यातीसाठी यामुळे अनुकूल वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे.