चिपळुणात एकाच दिवशी आढळले १२३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST2021-06-04T04:24:48+5:302021-06-04T04:24:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यात मंगळवारी एकाच दिवसात तब्बल १२३ रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसातील हा सर्वात ...

चिपळुणात एकाच दिवशी आढळले १२३ रुग्ण
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यात मंगळवारी एकाच दिवसात तब्बल १२३ रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे. तसेच पाच जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ७६७ जणांवर विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी, हेल्मेटसक्ती यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी हाेत होती. दिवसाला ४० ते ५० रुग्णच सापडत होते. मात्र, अलीकडे बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी तब्बल १२३ रुग्ण सापडले आहेत. एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत कोरोनाने ३३५ जणांचा बळी घेतला आहे.
सध्या तालुक्यात ७६७ जण बाधित असून, त्यातील ७५ जणांवर कामथे, १५ जणांवर वहाळ कोविड सेंटर, आठ जणांवर पेढांबे कोविड सेंटर, २७ जणांवर श्री हॉस्पिटल, पाच जणांवर संजीवनी हॉस्पिटल, १३ जणांवर लाइफ केअर हॉस्पिटल, ३० जणांवर डेरवण हॉस्पिटल, नऊ जणांवर पुजारी हॉस्पिटल, पाच जणांवर सती आयुसिधी हॉस्पिटल, नऊ जणांवर हॉटेल ग्रीन पार्क, चौघांवर पेढांबे, श्री साईश्रद्धा कोविड सेंटर, आठ जणांवर रामपूर श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल, एकावर गोवळकोट मदरसा, तर ५५७ जणांवर घरातच उपचार सुरू आहेत.