१२१२ शिक्षक कारभारी मात्र दोन
By Admin | Updated: September 30, 2014 00:13 IST2014-09-30T00:10:29+5:302014-09-30T00:13:35+5:30
खेडची स्थिती : लेखनिकांवरच शिक्षण विभागाचा भार

१२१२ शिक्षक कारभारी मात्र दोन
खेड : अलीकडे सर्वत्र आलेली आधुनिकता शिक्षण संस्थांमध्येही आली आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जाही उंचावला असताना कामाचा हा व्याप सांभाळणारे हात मर्यादित राहिले आहेत. त्यामुळे कामे वेळेवर होत नसल्याची ओरड होऊ लागली आहे. खेड तालुक्यातील शिक्षण विभागातील सर्वच कारभार केवळ दोन लेखनिक सांभाळत असल्याने कामाचा खोळंबा होत आहे.
खेड तालुक्यातील शिक्षण विभागाकडे सध्या ४६७ शाळा आणि १२१२ शिक्षकांचा कार्यभार आहे. या विभागाकडे शिक्षण विभागाच्या कार्यभारासह शासनाच्या ऐनवेळी निर्माण होणाऱ्या कामांचाही ताण मोठ्या प्रमाणावर आहे़ अशातच वारंवार बदली होत असलेल्या शैक्षणिक धोरणांचा मोठा बोजा या विभागावर पडतो. हा बोजा सांभाळणारे मनुष्यबळ फारच कमी आहे.
या कार्यालयाला सहा कर्मचाऱ्यांची मंजुरी आहे. मात्र, दोन लेखनिकांना शिक्षणविषयक सारी कामे पार पाडावी लागत आहेत. काम अवाढव्य असल्याने दोघा कर्मचाऱ्यांकडून हे काम वेळेवर होत नाही़ तरीही कामाचा हा रेटा हाकण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना आटापिटा करावा लागत आहे. दोन वर्षांपूर्वी या विभागात तीन लेखनिक काम करीत होते. मात्र, सहा महिन्यांपूर्वी यातील एका कर्मचाऱ्याचा अपघात झाल्याने तो रजेवर आहे़
उर्वरित दोन कर्मचारी हे काम पाहात आहेत़ तालुक्यातील शिक्षकांच्या सेवापुस्तिका भरणे, बदलीनोंद पुस्तक भरणे, गोपनीय अहवाल देणे, वेतनश्रेणी पुस्तके व पगार पुस्तिका भरणे, शिक्षकांचा पगार करणे, शाळांच्या भेटीबाबतचे अहवाल तयार करणे, विविध प्रकारचे रजिस्टर्ड तयार करणे व तशा नोंदी ठेवणे, शिक्षणसेवकांच्या कामाची निश्चिती करणे आदी कामे या दोन कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत़ त्यामुळे अनेक कामांना विलंब होत आहे़
या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मंजूर पदे त्वरित भरावीत, अशी मागणी शिक्षक व पालकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
खेडच्या शिक्षण विभागातील प्रकार
रिक्त पदांची जंत्री, बोजा वाढला
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामे रंगाळली
कार्यालयाला ६ कर्मचाऱ्यांची मंजूरी.
कामाचा रेटा पुढे सरकवण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्याचा आटापिटा.
दोन वर्षापूर्वी तीन लेखनिक होते कार्यरत.