पडताळणीची १२ हजार प्रकरणे प्रलंबित
By Admin | Updated: July 4, 2014 23:59 IST2014-07-04T23:10:28+5:302014-07-04T23:59:39+5:30
रत्नागिरीची ,स्थिती...

पडताळणीची १२ हजार प्रकरणे प्रलंबित
रत्नागिरी : विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. २ रत्नागिरी या कार्यालयाकडे जूनअखेर शैक्षणिक २८२६, सेवाविषयक ९१५४ प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच ११० प्रकरणे शालेय, गृह चौकशीसाठी पोलीस दक्षता पथकाकडे वर्ग करण्यात आली आहेत, अशी एकूण १२०९० प्रकरणे समितीकडे प्रलंबित आहेत. ती निकाली काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या सहकार्याने विशेष निपटारा मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व शैक्षणिक, सेवाविषयक लाभार्थींनी जुलैपर्यंत त्यांच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी समिती कार्यालयाकडे संपर्क साधू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष मोहिममध्ये जी प्रकरणे निकाली काढण्यात येतील व जी प्रकरणे वैध ठरतील, त्यांची नावे संकेतस्थळावर टाकण्यात येतील. त्यांना एस. एम. एस. द्वारेसुध्दा मेसेज पाठविण्यात येईल. ज्या प्रकरणांमध्ये त्रुटी आढळून येतील, त्यांनासुध्दा कागदपत्र दाखल करण्यासाठी मेसेज देण्यात येईल. (प्रतिनिधी)