विदेशी मद्याचा ११ लाख रुपयांचा साठा जप्त
By Admin | Updated: June 22, 2014 01:41 IST2014-06-22T01:30:58+5:302014-06-22T01:41:19+5:30
उत्पादन शुल्क : रत्नागिरीनजीक पाली येथे धडक कारवाई

विदेशी मद्याचा ११ लाख रुपयांचा साठा जप्त
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील पाली येथे शुक्रवारी रात्री एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या प्रवासी मिनी बसमधून बेकायदा गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. यावेळी मिनीबससह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाच्या उपायुक्त उषा वर्मा आणि रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे अधिकारी मुंबई-गोवा महामार्गावर गस्त घालत होते.
शुक्रवारी रात्री या पथकाकडून महामार्गावरील वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी पुण्याहून मुंबईकडे जाणारी जान्हवी ट्रॅव्हल्स कंपनीची प्रवासी मिनीबस (एमएच-४८-के-०३१६) ही पालीतील एका धाब्यासमोर आली असता उत्पादन शुल्काच्या भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी तिला थांबविले. बस चालकाच्या केबीनसह मागच्या डिकीची तपासणी केली असता त्यामधील १२ बॅगांमध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आल. या मद्यसाठ्याचे मालक जतिन हेमंत तांडेल, दिलीप अशोक पारधी व बसचालक शकील सत्तार पटेल या तिघांना मुंबई दारुबंदी अधिनियमाखाली दारुबंदी गुन्ह्यांतर्गत अटक केली. यावेळी मिनीबससह ११ लाख ६ हजार ९५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमध्ये भरारी पथकाचे दुय्यम निबंधक पी. एस. कांबळे, लांजाचे निरीक्षक दाबेराव, दुय्यम निरीक्षक जितेंद्र पवार, रत्नागिरी ग्रामीणचे दुय्यम निरीक्षक अविनाश घाडगे, विजय हातिसकर, राम पवार, करण घुणावत, शंकर बागेलवाड, वैभव सोनावले, सुरेश शेगर, चक्रपाणी दहीफळे, अनिता डोंगरे, शशिकांत पाटील, मिलिंद माळी यांचा सहभाग होता. (शहर वार्ताहर)