जाकादेवी केंद्रातर्फे दोन दिवसांत १०८२ लसीच्या मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:24+5:302021-09-11T04:32:24+5:30
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे गावातील १० केंद्रांवर १०८२ कोरोना लसीच्या मात्रा देण्याचे उद्दिष्ट प्राथमिक ...

जाकादेवी केंद्रातर्फे दोन दिवसांत १०८२ लसीच्या मात्रा
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे गावातील १० केंद्रांवर १०८२ कोरोना लसीच्या मात्रा देण्याचे उद्दिष्ट प्राथमिक आरोग्य केंद्राने पूर्ण केले आहे. आतापर्यंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील ५१६२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तसेच आरोग्य व बांधकाम विभागाचे विद्यमान सभापती, करबुडे जिल्हा परिषद गटाचे सक्रिय सदस्य उदय बने यांच्या मार्गदर्शनाखाली जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरताडे यांच्या देखरेखीखाली गावातील दहा केंद्रांवर १०८२ लसीच्या मात्रा देण्यात आल्या. यामध्ये कोविशिल्ड व कोवॅक्सिन या लसींचा समावेश होता. आतापर्यंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे बोड्ये, करबुडे, खालगाव, देऊड, लाजुळ, तरवळ परिसरातील गावांमधील ५१६२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच ओरी, देऊड, आगरनरळ, आगवे,उक्षी, नरबे, करबुडे, रानपाट, तरवळ, चवे या गावात प्रत्यक्षात लसीकरण करण्यात आले. ही मोहीम उदय बने यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरताडे यांच्या नेतृत्वाखाली जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरदा कदम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
-------------------------
गणेशोत्सव कालावधीत बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसून आल्यास बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येऊन तपासणी करून घ्यावी.
- डॉ. महेश मोरताडे, वैद्यकीय अधिकारी