तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी १०० टक्के लसीकरण होणे आवश्यक : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:49+5:302021-08-22T04:34:49+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या जागतिक संकटाशी लढत असताना बरेच आप्तस्वकीय आपण गमावले आहेत. तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी ...

तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी १०० टक्के लसीकरण होणे आवश्यक : उदय सामंत
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाच्या जागतिक संकटाशी लढत असताना बरेच आप्तस्वकीय आपण गमावले आहेत. तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी आपले व आपल्या कुटुंबीयांचे लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. शिवसेनेतर्फे रत्नागिरी तालुक्यातील करबुडे आणि जाकादेवी येथे लसीकरण माेहीम राबविण्यात आली. त्यावेळी ते बाेलत हाेते.
पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार सर्व नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शिवसेना पक्षातर्फे भागातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत १८ ते २९ वयोगटातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.
मंत्री सामंत म्हणाले की, आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तींनी लस घेतली नाही अशा व्यक्ती आणि आपल्या विभागातील व्यक्तींची माहिती संबंधित पदाधिकाऱ्यांकडे द्यावी, जेणेकरून आपल्या भागातील नागरिकांचे लसीकरण करणे सोयीचे ठरेल. करबुडे पंचायत समिती गणामध्ये ४६० तर देऊड पंचायत समिती गणामध्ये ५२५ अशा एकूण ९८५ नागरिकांचे शनिवारी लसीकरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्यामुळे आपले कुटुंब, गाव, तालुका, जिल्हा व राज्य सुरक्षित राहण्यास मदत होईल. कायमस्वरूपी मास्क तोंडाला राहू नये यासाठी संपूर्ण लसीकरण हा संकल्प घेऊन या भागातील तरूणांनी मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सामंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, सदस्य महेश म्हाप, महिला जिल्हा उपसंघटक ममता जोशी, कांचन नागवेकर, उपतालुकाप्रमुख प्रवीण पांचाळ, पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, शंकर सोनवडकर, तालुका युवा अधिकारी तुषार साळवी, विभागप्रमुख श्रीकृष्ण घाणेकर, उपविभागप्रमुख चंद्रकांत साळवी, शहर युवा अधिकारी अभिजीत दुडये, केतन शेट्ये उपस्थित होते.