एका दिवसात तब्बल १० बंधारे
By Admin | Updated: October 18, 2015 23:59 IST2015-10-18T22:05:03+5:302015-10-18T23:59:41+5:30
नायशी ग्रामस्थांचा विक्रम : प्रांताधिकारी यांच्याकडून कौतुकाची थाप

एका दिवसात तब्बल १० बंधारे
असुर्डे : पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणी टंचाई भासण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यात विजय बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत चिपळूण तालुक्यातील नायशी येथील ग्रामस्थांनी एका दिवसात १० बंधारे बांधून विक्रम केला आहे. त्यांच्या या कामाचे प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी कौतुक केले आहे.
गावचे नूतन सरपंच किशोर घाग यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतरच जलशिवार योजना, ग्रामपंचायत स्तरावर मागासवर्गीयांना शिष्यवृत्ती तसेच अन्य विकासात्मक कामांना प्रारंभ केला आहे. यावर्षी कमी पडलेला पाऊस व भविष्यात उद्भवणारी पाण्याची समस्या यावर उपाययोजना करावी असे ग्रामपंचायतीने ठरवले होते़ शासनाच्या आवाहनानुसार त्यांनी गांधी जयंतीच्या निमित्ताने १ बंधारा बांधला़ मात्र, ग्रामस्थांचा उत्साह पाहून त्याच दिवशी सर्वानुमते एकाच दिवशी १० विजय बंधारे बांधायचे ठरवण्यात आले व त्याप्रमाणे नियोजनही करण्यात आले. नायशी गावातून जाणाऱ्या नदीवर ३०० ते ४०० मीटर अंतरावर एकाचवेळी दहा बंधारे बांधून चिपळूण तालुक्यात एकाचवेळी १० बंधारे बांधण्याचा विक्रम केला आहे.
चिपळूणचे प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी प्रत्यक्ष वनराई बंधारे पाहण्यासाठी नायशी गावाला भेट दिली. त्याठिकाणी झालेले काम पाहून ते भारावून गेले़ याबद्दल सरपंच किशोर घाग व सदस्य तसेच नायशी ग्रामस्थांंना धन्यवाद दिले़ त्याचप्रमाणे नायशी गावाला विकासात्मक कामांच्या दृष्टीकोनातून सर्व सहकार्य करण्याचे अभिवचनही दिले़ त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी शुभांगी पाटील, उपगटविकास अधिकारी भोसले, कृषी अधिकारी खरात, चव्हाण, शेंडगे, तलाठी नितीन धुरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
बंधारे बांधकामावेळी दुपारच्या स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले होते़ यामध्ये प्रांताधिकारी हजारे व गटविकास अधिकारी पाटील व इतर अधिकारी सहभागी झाल्याने ग्रामस्थांचा आनंद द्विगुणीत झाला़ या सर्व बंधाऱ्यांतील पाण्याचे नियोजन व वापर योग्य पध्दतीने केला जाणार आहे़ यामुळे परिसरातील आजूबाजूच्या विहिरींमधील पाण्याच्या पातळीतही वाढ होईल़ (प्रतिनिधी)
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधारे बांधण्याचा उपक्रम.
ग्रामस्थांचा उत्साह पाहून एकाच दिवशी बांधले बंधारे.
प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी दिली गावाला भेट़
बंधाऱ्यांमुळे विहिरींमधील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत.
स्नेहभोजनाचाही घेतला आस्वाद.