जितेंद्र प्रधान
जयपूर : संघटित गुन्हेगारी व बेकायदेशीर शस्त्रसाठ्याच्या नेटवर्कचे कंबरडे मोडण्यासाठी एजीटीएफने प्रतापगड पोलिसांच्या सहकार्याने केलेल्या कारवाईत १४ बेकायदेशीर विदेशी व देशी शस्त्रे, १८६० जिवंत काडतुसे आणि १० मॅगझिनचा प्रचंड साठा जप्त केला. या प्रकरणी कुख्यात गँगस्टर सलमान खान आणि त्याला शस्त्रपुरवठा करणारा राकेशकुमार याला अटक करण्यात आली.
सलमानचे वडील होते पोलिस, मग तेही बनले गुंड
सलमानचे वडील शेरखान पठाण पोलिस सेवेत होते. मात्र, नंतर हत्या व अन्य गुन्ह्यांमध्ये तेही अडकले व एका चकमकीत मारले गेले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तो लहान वयातच गुन्हेगारी विश्वात शिरला. त्याने शालेय शिक्षण अर्धवट सोडले.
इतरांचे भूखंड बळकावून नावाची दहशत निर्माण केली. मात्र, आपल्यावर कारवाई होण्याच्या भीतीने त्याने बनावट पासपोर्ट तयार करून काही काळ दुबईला पलायन केले. त्यानंतर तो परत आला, तेव्हा खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली.