जिल्हा परिषद शिक्षकांचे उद्या उपोषण
By Admin | Updated: April 24, 2017 02:32 IST2017-04-24T02:32:34+5:302017-04-24T02:32:34+5:30
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हा परिषद शिक्षक यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याबाबतच्या शासन निर्णयाच्या विरोधात

जिल्हा परिषद शिक्षकांचे उद्या उपोषण
मोहोपाडा : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हा परिषद शिक्षक यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याबाबतच्या शासन निर्णयाच्या विरोधात आणि प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मंगळवारी २५ एप्रिल रोजी मुंबईतील आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणाला राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार असल्याचे शिक्षक परिषदेचे कार्यालयीन चिटणीस सुशील वाघमारे यांनी सांगितले.
यावेळी वेणुनाथ कडू (शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष),आमदार संजय केळकर, नागो गाणार (शिक्षक आमदार नागपूर विभाग), आमदार अनिल सोले, नरेंद्र वातकर (शिक्षक परिषद सरकार्यवाह), राजेश सर्वे (अध्यक्ष प्राथमिक विभाग) उपस्थित राहणार आहेत. २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयातील त्रुटी दूर करणे, फेरबदल आदेश प्राप्त करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शाळांची विद्युत देयके माफ करणे, संगणक अर्हता सूट मिळणे, शालेय पोषण आहार मानधन वेळेवर मिळावे, आंतर जिल्हा बदली शासन आदेश तातडीने पारित करणे, सर्व शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश, राज्य शासकीय कर्मचारी विमा योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे, कॅशलेस योजना तत्काळ लागू करणे आदी मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यालयीन चिटणीस सुशील वाघमारे यांनी दिली आहे. तरी राज्यातील अधिक शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही वाघमारे यांनी केले आहे.(वार्ताहर)