‘झेनिथ’ बंदमुळे पालक आक्र मक
By Admin | Updated: June 15, 2016 01:04 IST2016-06-15T01:04:46+5:302016-06-15T01:04:46+5:30
खोपोली शहरातील झेनिथ उद्योग समूहाची इंग्लिश माध्यमाची शाळा बंद होणार असल्याने पालक चिंतेत असून पालकांनी कंपनी प्रशासनावर संताप व्यक्त करून उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

‘झेनिथ’ बंदमुळे पालक आक्र मक
खालापूर : खोपोली शहरातील झेनिथ उद्योग समूहाची इंग्लिश माध्यमाची शाळा बंद होणार असल्याने पालक चिंतेत असून पालकांनी कंपनी प्रशासनावर संताप व्यक्त करून उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. सोमवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालकांची भेट घेऊन उपोषणास पाठिंबा दिला.
खोपोली शहरातील नामांकित झेनिथ कंपनी गेल्या चार वर्षांपूर्वी अचानक बंद केल्याने एकीकडे कामगार देशोधडीला लागला असताना झेनिथ कंपनी आवारात कंपनी स्थापनेपासून कामगारांच्या मुलांसाठी कंपनी प्रशासनाने इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू केली. दरम्यान, कालपर्यंत ही शाळा सुरू होती तर अलीकडे कंपनीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना शाळेच्या दुरुस्तीसाठी शाळा दोन वर्षे बंद ठेवणार असल्याचे कळविले. पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता शिक्षण कुठे घ्यायचे, असा यक्ष प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे. कंपनीने शाळा दुरुस्तीचे पत्र अलीकडेच दिल्याने आता ऐन वेळी मुलांना पालकांनी शिकवायचे कसे, हा प्रश्न पालकांना सतावत आहे. पालकवर्ग कंपनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करीत असून पालकांच्या लढाईत मनसेने पाठिंबा दिला आहे. सोमवारी मनसे जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक दर्गे, अविनाश देशमुख, महेश देशमुख, विनीत मोडक, महेश सोगे, विश्वास दर्गे, संजय दळवी आदी कार्यकर्त्यांनी पालकांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. १६ जूनपर्यंत कंपनी प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतला नाही तर पालक आणि मनसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उपोषण करणार असल्याचे पालकांनी सांगितले आहे. याबाबत शिक्षण अधिकारी, पोलीस यांच्यासोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याबाबत सूचना केली आहे, अन्यथा मनसे आक्र मक होईल असे अभिषेक दर्गे यांनी सांगितले. (वार्ताहर)
मार्ग काढण्याच्या सूचना
याबाबत शिक्षण अधिकारी, पोलीस यांच्यासोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याबाबत सूचना मनसेने केली आहे, अन्यथा बिर्ला उद्योग समूहाच्या विरोधात मनसे आक्र मक होणार असल्याचे अभिषेक दर्गे यांनी सांगितले. १६ जूनपर्यंत कंपनी प्रशासनाने निर्णय मागे घेतला नाही तर पालक आणि मनसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उपोषण करणार असल्याचे पालकांनी सांगितले.