लॉकडाऊन काळात तरुणाने केली शेवग्याची लागवड; ८ ते १० लाखांचं उत्पन्न अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 00:47 IST2021-01-24T00:09:52+5:302021-01-24T00:47:50+5:30
खलर्ड गावातील प्रमोद कडूने केली मशागत

लॉकडाऊन काळात तरुणाने केली शेवग्याची लागवड; ८ ते १० लाखांचं उत्पन्न अपेक्षित
गिरीश गोरेगावकर
माणगाव : लॉकडाऊन काळात प्रत्येक जण आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घेत होते. प्रमोद कडू यांनी हे निमित्त साधून ॲग्रीकल्चर डिप्लोमा याचा त्याने पुरेपूर उपयोग अमलात आणला. महाड तालुक्यातील रायगड किल्ल्यापासून ६ किलोमीटर अंतरावर, सावरट ग्रामपंचायतमधील खलईगाव या गावात शेवग्याच्या २,५०० रोपांची त्यांनी लागवड केली आहे.
प्रथम त्यांनी आपल्या गावातील जमिनीच्या मातीचे परीक्षण केले. दापोली कृषी विद्यापीठ (रोहा ब्रांच) ॲग्रीकल्चर डिप्लोमा करत असलेल्या शिक्षणाचा उपयोग झाला. मातीच्या परीक्षणावरून त्यांना हे लक्षात आले की, कोणकोणत्या प्रकारची लागवड करता येऊ शकते. त्यांनी शेवगा या जातीचे निवड केली. कारण शेवग्याच्या शेंगांना बाजारात भरपूर मागणी आहे, तसेच त्याचा पालासुद्धा आरोग्यदायक आहे. प्रथम त्यांनी नर्सरी तयार करून बियांपासून रोपे तयार केली. नंतर ती रोपे त्यांनी ३० दिवसानंतर त्यांची जमिनीत लागवड केली. त्यांनी १०० टक्के सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्याचे ठरविले आहे. स्वदेश फाउंडेशन या संस्थेकडून त्यांनी ठिबक सिंचन करून घेतले. त्यांना सरासरी उत्पादन सगळा खर्च काढून ८ ते १० लाख रुपये उत्पादनाची अपेक्षा आहे, तसेच त्यांनी अंतरपिके घेण्याची ही तयारी केली आहे.
कृषी विभागीय अधिकाऱ्यांनी गाव खेड्यात जाऊन शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात त्यांची माहिती द्यावी, जेणेकरून शेतकरी भातपिकाव्यतिरिक्त दुसरे पीक घेऊ शकतो व त्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो.
प्रमोद कडू, शेतकरी