Working movement of the revenue department; Holding in debt | महसूल विभागाचे कामबंद आंदोलन; कर्जतमध्ये धरणे

महसूल विभागाचे कामबंद आंदोलन; कर्जतमध्ये धरणे

कर्जत : रायगड जिल्ह्यातील महाड येथे कामावर असलेल्या तलाठी यांना मारहाणप्रकरणी महाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्यावर कारवाई करण्याचे मागणीसाठी सोमवारी महसूल विभागाने काम बंद आंदोलन उभे केले. दिवसभर कर्जत तहसिल कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करून ही मागणी रायगड तलाठी संघाच्या वतीने करण्यात आली.

महाड येथील कोंझर तलाठी सजाचे तलाठी सुग्राम सोनवणे यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांच्या कोणताही संबंध नसताना गुन्हा दाखल करून अटक केली. याबाबत संबंधित पोलीस अधिकारी सणस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे मागणीसाठी रायगड तलाठी संघाच्या वतीने कर्जत तालुक्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. सकाळपासून महसूल विभागाचे सर्व ३० तलाठी, चार मंडल अधिकारी आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी यांनी काम बंद आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तलाठी संघाचे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष बापू सरगर, उपाध्यक्ष रमेश भालेराव, सचिव दीप्ती चोणकर यांनी सायंकाळी आपल्या मागणीचे निवेदन कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना देऊन एक दिवसाचे काम बंद आंदोलन स्थगित केले. मात्र महसूल विभागातील कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी काम बंद आंदोलनामुळे महसूल विभागातील सर्व कामे ठप्प झाली होती. तहसील कार्यालयात निवडणूक वगळता कोणतीही कामे दिवसभरात झाली नाहीत. तलाठी संघाने पुकारलेल्या या एकदिवसीय काम बंद आंदोलनात महसूल कर्मचाऱ्यांनी 100 टक्के सहभाग नोंदविल्याची माहिती कर्जत तालुका अध्यक्ष बापू सरगर यांनी दिली.

खालापूरमध्ये कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने जनतेचे हाल
मोहोपाडा : खालापूर तालुक्यातील सर्व महसूल विभागाच्या कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन केल्याने सर्वसामान्य लोकांना त्रास झाला आहे.
तलाठी सुग्राम सोनवणे यांच्यावर कारवाई करण्याचा पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांना अधिकार नसताना त्यांनी बेकायदेशीरपणे त्यांना अटक केली आहे, असे जिल्हा तलाठी संघटना व जिल्हा महसूल कर्मचारी संघटना यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोमवारी जिल्ह्यात कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
रविवारी कार्यालय बंद होते. सोमवारी सर्वसामान्य जनता आपली कामे घेऊन तालुक्याच्या ठिकाणी पोहोचले. मात्र, कामबंद आंदोलनामुळे त्यांना माघारी फिरावे लागले आहे, त्यामुळे मोलमजुरी करणारे यांची मजुरी फुकट गेली, त्यांचे आर्थिक नुकसान झाले, तसेच शेतीची नुकसान भरपाईसाठी होणारे कामकाज बंद पडले आहे, त्यामुळे शेतकरी आणखी संकटात सापडला आहे.

पनवेलमध्ये तहसीलदारांना दिले निवेदन
कळंबोली : महाड तालुक्यातील कोझर येथील तलाठी सुग्राम जामसिंग सोनावणे यांच्यावर पूर्वपरवानगी न घेता महाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई नियमबाह्य असल्याने सोनवणे यांच्यावर अन्याय झाल्याचे जिल्ह्यातील सर्व तलाठी यांचे म्हणणे आहे. याविरोधात पनवेल तहसील कार्यालयसमोर तालुक्यातील तलाठ्यांनी आंदोलन करत महाड पोलिसांचा निषेध केला. सणस यांच्यावर निलंबनाची कारवाई करून सोनवणे यांना न्याय द्यावा, अशा मागणी करता पनवेल तहसील कार्यालयासमोर ही तालुक्यातील तलाठ्यांनी धरणे आंदोलन केले. आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार अमित सानप यांना दिले. यामुळे गावातील नागरिकांच्या कामांचा एक प्रकारे खोळंबा झाला.
या प्रकरणासाठी जिल्हाधिकाºयांना साकडे घालण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमीका घेत या प्रकरणासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. चौकशी अंती योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळाल्याने दहा दिवस आंदोलन स्थगित केल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Web Title: Working movement of the revenue department; Holding in debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.