नेरळ-माथेरान घाटरस्त्याचे काम आॅक्टोबरपासून बंद

By Admin | Updated: April 16, 2017 04:35 IST2017-04-16T04:35:00+5:302017-04-16T04:35:00+5:30

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगर मुंबईपासून सर्वात जवळ असलेले माथेरान हे थंड हवेचे ठिकाण, तेथे जाण्याच्या वाहतूक समस्येमुळे संकटात सापडले आहे.

The work of the Nerol-Matheran expedition is closed from October | नेरळ-माथेरान घाटरस्त्याचे काम आॅक्टोबरपासून बंद

नेरळ-माथेरान घाटरस्त्याचे काम आॅक्टोबरपासून बंद

- अजय कदम, माथेरान

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगर मुंबईपासून सर्वात जवळ असलेले माथेरान हे थंड हवेचे ठिकाण, तेथे जाण्याच्या वाहतूक समस्येमुळे संकटात सापडले आहे. राज्य सरकारच्या पुढाकाराने एमएमआरडीएने २७ कोटींचा निधी घाट रस्ता तयार करण्यासाठी दिला असून, वन विभागाने हरकत घेतल्याने रस्त्याचे काम आॅक्टोबर २०१६ पासून बंद आहे. खराब रस्त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्याच वेळी वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने माथेरानच्या पर्यटनावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
माथेरान या ब्रिटिशांनी शोधलेल्या थंड हवेच्या ठिकाणी पुढील दीड महिना पर्यटकांची गर्दी असते. त्यात मुंबई या महानगरापासून सर्वात जवळ असलेल्या माथेरानला पर्यटकांची नेहमी पसंती राहिली आहे. मात्र, या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेले वाहतुकीचे दोन मार्ग अस्तित्वात आहेत. नेरळ-माथेरान मिनीट्रेन आणि नेरळ-माथेरान घाटरस्ता अशी व्यवस्था असलेल्या या दोन्ही वाहतूक मार्गाची अवस्था बिकट आहे.
नेरळ-माथेरान मिनीट्रेनची सेवा मिनीट्रेन नॅरोगेज रुळावरून घसरल्यानंतर ९ मे २०१६ पासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे देशातील धोकादायक घाट रस्त्यांच्या यादीत नेरळ-माथेरान घाट रस्त्याचा क्र मांक वरचा लागतो. कारण जागच्या जागी असलेली वळणे असलेला हा सात किलोमीटरचा घाट रस्ता पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन राज्य सरकारने अधिक रुंद आणि धोकादायक वळणे कमी करण्यासाठी एमएमआरडीएला निधी देण्यास सांगितले. प्राधिकरणने या घाटरस्त्यासाठी २७ कोटींचा निधी मंजूर केला असून, मार्च २०१६ मध्ये रस्त्याच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली होती.
रस्त्याच्या दुतर्फा आरसीसी काँक्रीटची गटारे, संरक्षक भिंती, डांबरीकरण तसेच रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध असेल तेथे बगिचा असे नियोजन असलेल्या रस्त्याच्या कामास सुरु वात झाली. नेरळ हुतात्मा चौक ते जुम्मापट्टी या भागातील आरसीसी पद्धतीने गटारे आणि काही ठिकाणी नवीन, तर काही ठिकाणी जुन्या अवस्थेतील संरक्षक भिंती यांची कामे करण्यात आली.
सप्टेंबर २०१६पासून ठेकेदार कंपनीने कर्जत वन विभागाच्या हद्दीत म्हणजे जुम्मापट्टीपासून पुढे रस्त्याचे काम माथेरानकडे सुरू केले. त्यावेळी या जमिनीचा ताबा असलेल्या वन विभागाच्या कर्जत येथील कार्यालयाने प्राधिकरणला रस्त्याचे काम करू देण्यास विरोध केला. तेव्हापासून रस्त्यावर कोणतेही नवीन काम केले गेले नाही. परिणामी प्रवासी वाहतूक करणे अत्यंत धोकादायक झाल्याने नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेने दिवाळी पर्यटन हंगाम लक्षात घेऊन रस्त्याच्या दुरु स्तीची मागणी केली. एमएमआरडीएने दुरु स्तीस विरोध केल्यानंतर टॅक्सी संघटनेने टॅक्सीसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राधिकरणला रस्त्याची डागडुगी करण्याचे आदेश दिल्यानंतर ठेकेदाराने तात्पुरती दुरु स्ती केली होती.

- वन विभागाचे अधिकारी अनिल लांडगे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी आणण्यात यावी आणि त्यानंतर रस्त्याचे काम सुरू करावे, यावर वन विभाग ठाम आहे. त्यामुळे २७ कोटी खर्चून पर्यटकांसाठी बनविण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणला बंद ठेवावे लागले आहे. या सर्व घडामोडीत घाट रस्त्यातील सुरक्षित वाहतुकीचा विषय आणि पर्यटन वाढीचा, असे दोन्ही विषय मागे पडले आहेत.

Web Title: The work of the Nerol-Matheran expedition is closed from October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.