पालकमंत्री पदापेक्षा कामाला अधिक महत्व, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न - अदिती तटकरे
By राजेश भोस्तेकर | Updated: October 6, 2023 15:41 IST2023-10-06T15:41:01+5:302023-10-06T15:41:18+5:30
आम्ही सर्व एकत्रित काम करीत असून पदापेक्षा कामाला महत्त्व देते. असे उत्तर महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहे.

पालकमंत्री पदापेक्षा कामाला अधिक महत्व, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न - अदिती तटकरे
अलिबाग : रायगडाचा विकास कसा होईल, रखडलेली कामे, प्रकल्प कशी मार्गी लागतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्री असून ते सक्षम काम करीत आहेत. आम्ही सर्व एकत्रित काम करीत असून पदापेक्षा कामाला महत्त्व देते. असे उत्तर महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहे.
महिला व बाल विकास विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय पोषण माह सांगता समारोप कार्यक्रमास महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे शुक्रवारी अलिबाग उपस्थित होता. अलिबाग मधील होरियजन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमानंतर अदिती तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रायगडाच्या पालकमंत्री पदासाठी आपण इच्छुक आहात का या विचारलेल्या प्रश्नाला रखडलेल्या कामाकडे लक्ष देत असल्याचे उत्तर देऊन वेळ मारून नेली आहे.
रायगडाच्या पालकमंत्री पदावरून जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याचे पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे. याबाबत अदिती तटकरे यांना विचारले असता, उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्री आहेत. ते उत्तमपणे जिल्ह्यात काम करीत आहे. पालकमंत्री पदापेक्षा जिल्ह्यात रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे आमचा मानस आहे. मेडिकल कॉलेज, महिला जिल्हा रुग्णालय, आरोग्य यंत्रणा सक्षम करणे, माणगाव ट्रॉमा सेंटर या कामाकडे माझे जास्त लक्ष आहे.
अलिबाग येथील रखडलेल्या मेडिकल कॉलेजचे काम हे संथगतीने सुरू होते. त्याला गती मिळाली आहे. विभागीय क्रीडा संकुल तांत्रिक अडचणीत सापडले होते. त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. राजकीय किंवा कुठले पद कोणाकडे आहे यापेक्षा जिल्ह्यातील सगळेच आम्ही शासनात आहोत. त्यामुळे जिल्ह्यासाठी काय करू शकतो याकडे आम्ही लक्ष देत आहोत.