आगरदांडा-इंदापूर महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 00:17 IST2021-03-04T00:17:39+5:302021-03-04T00:17:58+5:30
दिघी बंदराच्या विकासाला वेग : रस्ते कॉंक्रीटचे झाल्याने प्रवास झाला जलद

आगरदांडा-इंदापूर महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
आगरदांडा : रायगड जिल्ह्यातील इंदापूर ते आगरदांडा राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत रेवदंडा - इंदापूर हा मार्ग पर्यटन आणि बंदराच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. या रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून आता पर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे. हा महामार्ग या गावातील पर्यटन, व्यवसाय, व्यापा-यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यात दिघी बंदराचा संपूर्ण ताबा गौतम अदानी यांना मिळाल्यावर त्यांनी दिघी बंदराच्या विकासासाठी दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केल्याने या बंदराच्या विकासाला आता वेग प्राप्त झाला आहे.
दिघी बंदराचा विकास जेएनपीटी बंदरासारखाच करणार असून, मालवाहतूक हाताळणीचे पर्यायी केंद्र म्हणून दिघी बंदर विकसित करणार असल्याची घोषणा अदानी ग्रुपकडून करण्यात आल्याने आर्थिक घडामोडींचा वेग प्राप्त झाला आहे.
बंदर वाहतुकीसाठी रस्ते हे सुसज्ज असावे यासाठी प्रथम रस्ते एमएसआरडीसीमार्फत विकसित करण्यात आले आहेत. आगरदांडा ते इंदापूर हा सर्व रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आलेला असून, या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने या रस्त्यामुळे वाहतूक जलद झाली आहे. दिघी बंदरातील आलेला माल जलद गतीने रेल्वेच्या साह्याने पोहोचविण्यासाठी आगरदांडा ते इंदापूर हा रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून, बंदर विकासाचा हा पहिला टप्पा आहे.
रस्त्यासाठी ११० कोटी रुपये खर्च
nरायगड जिल्ह्यातील इंदापूर ते आगरदांडा राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत रेवदंडा- इंदापूर हा मार्ग पर्यटन आणि बंदराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
nकेंद्र शासनाच्या माध्यमातून हे रस्ते तयार करण्यात आले असून, जलद गतीने महामार्ग गाठण्यासाठी हा रस्ता खूप उपयोगी पडणार आहे. आगरदांडा ते इंदापूर रस्त्यासाठी सुमारे
११० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, मालवाहतुकीसाठी हा रस्ता मुख्य केंद्र असणार
आहे.