दरीत पडलेल्या महिलेला टॅक्सी चालकांनी काढले बाहेर
By Admin | Updated: November 17, 2015 00:30 IST2015-11-17T00:30:50+5:302015-11-17T00:30:50+5:30
नेरळ-माथेरान घाट रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे सोमवारी दुपारी एक दुचाकी दरीत जाता जाता वाचली. मात्र त्या दुचाकीवरील महिला ५० फूट दरीत कोसळली.

दरीत पडलेल्या महिलेला टॅक्सी चालकांनी काढले बाहेर
कर्जत : नेरळ-माथेरान घाट रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे सोमवारी दुपारी एक दुचाकी दरीत जाता जाता वाचली. मात्र त्या दुचाकीवरील महिला ५० फूट दरीत कोसळली. नेरळ -माथेरान टॅक्सी संघटनेच्या दोन टॅक्सी चालकांनी दरीत उतरून त्या पर्यटक महिलेला सुखरूप बाहेर काढले.
नेरळङ्क्त- माथेरान घाट रस्त्यावर जुम्मापट्टी ते दस्तुरीदरम्यान रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सोमवारी दुपारी घाटात दुचाकीने चढत असताना एका वळणावर त्यांची दुचाकी दरीत जात असताना तेथील लोखंडी रोलिंगवर आदळली. मात्र त्यावेळी महिला दुचाकीस्वाराला काही माहिती होण्याआधी दरीत कोसळली. त्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी रस्त्याचे काम करण्यासाठी आणलेला रोलर खाली दरीत गेला होता. त्याच ठिकाणी ती महिला दरीमध्ये कोसळली. याची माहिती दस्तुरी नाका येथे टॅक्सी स्टँड कार्यालयात समजली. यावेळी उपस्थित असलेले टॅक्सी चालक तेथे पोहचले. त्यातील बंटी पारटे आणि अनिल सुर्वे हे दोर घेवून खाली दरीत उतरले. साधारण ५० फूट खोल दरीत कोसळलेल्या महिलेला तासभराच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले.
मुख्य रस्त्यावर दोर पकडण्यासाठी अनेक टॅक्सी चालक उपस्थित होते. सुखरूप बाहेर निघालेली महिला काहीही न बोलता निघून गेल्याने टॅक्सी चालकांना तिचे नावही समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.