वीज पडून महिला ठार; २ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 22:03 IST2020-10-13T22:03:53+5:302020-10-13T22:03:59+5:30

तालुक्यात मंगळवारी दुपारीच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला.

Woman killed by lightning; 2 injured | वीज पडून महिला ठार; २ जखमी

वीज पडून महिला ठार; २ जखमी

देवरूख : मंगळवारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्यात तुळसणी येथे विजेच्या धक्क्याने एक महिला मृत झाल्याची दुर्दैवी घटना घडली, तसेच मेघी सोलकरवाडी येथे वीज पडल्याने हसम कुटुंबातील दोनजण बेशुध्द पडले होते. या जखमींवर देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

तालुक्यात मंगळवारी दुपारीच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तुळसणी येथे वीज पडली. येथील रियाना दिलावर मुकादम (४५) या कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. याचवेळी कोसळलेल्या विजेच्या धक्क्याने मुकादम या बेशुध्द पडल्या. त्यांना तत्काळ देवरुखात प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय सुत्रांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.

तालुक्यातील मेघी सोलकरवाडी येथेही वीज कोसळली. ही वीज सागाच्या झाडावर पडल्याने झाड चिरले गेले आहे. या झाडाजवळ घर असलेल्या हसम कुटुंबियांना याचा धक्का बसला. कुटुंबातील संदीप जयराम हसम व पूजा दीपक हसम हे बेशुध्द पडले. ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले. संदीप आणि पूजा हसम यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय सुत्रांनी दिली. हसम घरातील पाच लहान मुलांनाही किरकोळ धक्का बसला.

Web Title: Woman killed by lightning; 2 injured

टॅग्स :Raigadरायगड