माथेरानमध्ये कोण करणार सत्ता काबीज?
By Admin | Updated: November 14, 2016 04:23 IST2016-11-14T04:23:50+5:302016-11-14T04:23:50+5:30
उमेदवारी नामांकन मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबरला केवळ दोन अपक्ष महिला उमेदवारांनी प्रभाग आठ ब आणि प्रभाग आठ क मधून उमेदवारी

माथेरानमध्ये कोण करणार सत्ता काबीज?
माथेरान : उमेदवारी नामांकन मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबरला केवळ दोन अपक्ष महिला उमेदवारांनी प्रभाग आठ ब आणि प्रभाग आठ क मधून उमेदवारी मागे घेतल्याने नगरसेवक पदांसाठी एकूण ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर नगराध्यक्ष पदांसाठी भाजपा १, शिवसेना १, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीतर्फे १ आणि १ अपक्ष महिला उमेदवार सज्ज आहेत. यावेळेस ही निवडणूक ऐतिहासिक होणार आहे. कारण एकाच कुटुंबातील दोन महिला नगराध्यक्ष पदांसाठी परस्पर उभ्या आहेत. येथल्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच चौरंगी लढत नागरिकांना पहावयास मिळणार असल्याने खरी रंगत शिवसेना आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीसोबतच होणार आहे.
प्रत्येक पक्षाने नगरपरिषदेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी रस्सीखेच सुरू केली असून या चौरंगी लढतीत स्वबळावर शिवसेना आणि भाजपा हेच पक्षाच्या अधिकृत चिन्हावर सामोरे जात आहेत.तर राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस यांची जरी आघाडी असली तरीसुद्धा घड्याळ आणि हाताचा पंजा ही आपापली चिन्हे घेऊन दोन्ही कॉँग्रेस निवडणुकीला सज्ज झाले आहेत. दरम्यान, एकच अपक्ष उमेदवार आहे. दोन्ही बाजूंची काहीअंशी मते आपल्याच पारड्यात पाडून सत्तेच्या समीप जाणाऱ्या शिवसेना आणि दोन्ही कॉँग्रेस यांना शह देऊन काहीशा फरकानेच या निवडणुकीत काठावर पास व्हावे लागणार असून काँटे की टक्कर या निवडणुकीत सर्वच नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. सध्यातरी शिवसेनेचा जोर अधिक असला तरीसुद्धा दोन्ही कॉँग्रेस मिळून एकट्या शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी कंबर कसून आहेत. शिवसेनेत नवोदित उमेदवारांचा भरणा असल्याने त्यांना सहजपणे रोखून धरू असा ठाम विश्वास जरी दोन्ही कॉँग्रेसला असला तरी मागील दोन वर्षांच्या काळात सत्तानिहाय कामांचा सपाटा शिवसेनेच्या प्रमुख मंडळींनी, कार्यकर्त्यांनी लावल्याने स्वबळावर विजयी होऊ असा विश्वास आहे.