माथेरानच्या राणीचे स्वागत
By Admin | Updated: May 26, 2016 03:03 IST2016-05-26T03:03:30+5:302016-05-26T03:03:30+5:30
मिनीट्रेनची बोगी दोनदा घसरल्याने विविध कारणे पुढे करून रेल्वे प्रशासनाने ही सेवाच बंद करण्याचा कठोर निर्णय घेतल्यामुळे स्थानिकांच्या या जीवनवाहिनीबाबतच्या सर्वच आशा

माथेरानच्या राणीचे स्वागत
माथेरान : मिनीट्रेनची बोगी दोनदा घसरल्याने विविध कारणे पुढे करून रेल्वे प्रशासनाने ही सेवाच बंद करण्याचा कठोर निर्णय घेतल्यामुळे स्थानिकांच्या या जीवनवाहिनीबाबतच्या सर्वच आशा धूसर झाल्या होत्या. यासाठी राजकारण बाजूला ठेवून केवळ स्थानिकांच्या उदरनिर्वाहाची गहण समस्या लक्षात घेऊन येथील सर्वपक्षीय नेत्यांनी थेट दिल्ली गाठून मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या सहकार्याने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन स्थानिकांच्या समस्येबाबत साकडे घातले. त्यावर रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यामुळेच रेल्वे प्रशासनाला ही हेरिटेज दर्जा प्राप्त मिनीट्रेन अखेरीस सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घ्यावा लागला. बुधवारी (२५ मे) दुपारी १ वाजता एन.डी.एम.४०० हे नवीन इंजिन, सहा एअर ब्रेक बोगी आणि एकूण वीस कामगारांसह माथेरान स्थानकात दाखल झाली. यावेळी माथेरानच्या राणीचे फटाक्यांची आतषबाजी तसेच पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
पंधरा दिवसानंतर माथेरानच्या राणीचे दर्शन हे पर्यटकांसाठी नावीन्यपूर्ण असल्याने स्थानकात क्षणभर का होईना गाडीत बसण्याचा आणि फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. गाडीचे चालक तसेच सर्वच कामगारवर्गाचा सत्कार या निमित्ताने करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत चौधरी, प्रसाद सावंत, माजी नगरसेवक प्रकाश सुतार, सामाजिक कार्यकर्त्या प्रेरणा सावंत आदींसह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि माथेरानकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
सध्या आम्ही गाडी सरावा (ट्रायल) साठी आणली असून या मार्गातील तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा अहवाल वरिष्ठाकडे सादर करून लवकरच ही गाडी आपल्या दिमतीसाठी हजर होईल
-एस.बी.सिंग,
रेल्वे निरीक्षक, नेरळ
आम्हाला हा मार्ग उत्तम स्थितीत दिसत असून आता गाडी येण्यास काहीच अडचण नाही. लवकरच ही सेवा पूर्ववत होईल.
- शरद सानप,
रेल्वे चेकमन, नेरळ
माथेरानकर आणि ट्रेन हे एक समीकरण बनलेले आहे. सर्वांचेच जीवनमान गाडीशी निगडित असल्याने आम्ही सदर बाबतीत रेल्वे मंत्र्यांना गाऱ्हाणे सांगितल्यावरून त्यांनी स्थानिकांच्या या प्रश्नावर योग्य निर्णय घेतला असून स्थानिकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.
- प्रसाद सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख