१० दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प
By Admin | Updated: May 27, 2016 02:33 IST2016-05-27T02:33:18+5:302016-05-27T02:33:18+5:30
चावणे पाणीपुरवठा योजनेतील २७ गावांना सिडकोच्या हेटवणे मुख्य जलवाहिनीवरून पाणीपुरवठा होतो. मात्र गेले सहा-सात महिने सिडकोच्या जिते येथील वॉटर फिल्टर प्लांटवर दोन इलेक्ट्रीक

१० दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प
पेण : चावणे पाणीपुरवठा योजनेतील २७ गावांना सिडकोच्या हेटवणे मुख्य जलवाहिनीवरून पाणीपुरवठा होतो. मात्र गेले सहा-सात महिने सिडकोच्या जिते येथील वॉटर फिल्टर प्लांटवर दोन इलेक्ट्रीक पॉवर पंपाव्दारे पाणी खेचल्याने या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांना याचा थेट फटका बसल्याची अनेक गावांची तक्रार आहे. गणेशमूर्ती निर्माणाचे मुख्य केंद्र असलेल्या तांबडशेत, जोहे, कळवे या कलाग्राम नगरीचा गेले १० दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
परिसरातील पाच ग्रामंपचायतींमधील ७ गावे २० हजार लोकवस्तीवर पाणी-पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. गावकरी महिला, खासगी टेम्पोमध्ये हमरापूर फाट्यावरून पाणी नेत आहेत. पाण्यासारख्या मूलभूत गरजेवर सिडको व्यवस्थापनाने ऐन उन्हाळ्यात अरेरावी केल्याने ग्रामस्थ सिडको प्रशासनाच्याविरुध्द आक्रमक झाले आहेत. पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांना या विभागातील सरपंचाचे शिष्टमंडळ भेटून सिडकोची दादागिरी आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा दिली आहे.
हेटवणे मध्यम प्रकल्पातून सिडकोला ५८.५० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षण केलेले आहे, मात्र सिडकोला पाणी देताना सिडकोची मुख्यपाइपलाइन पेण तालुक्यातून खारपाडा गावाच्या हद्दीपर्यंत येणारी चावला पाणीपुरवठा योजनेतील गावांना सिडकोने पिण्याचे पाणी द्यावे असा करार, राज्याचे दिवंगत विरोधी पक्षनेते दत्ता पाटील व दिवंगत माजी मंत्री मोहन पाटील या शेकापच्या नेतेमंडळींनी केलेला होता. त्यानुसार गेले दीड दशक चावला पाणीपुरवठा योजनेतील समाविष्ट गावांना पाणीपुरवठा होत असताना, गेले सहा-सात महिने सिडकोच्या नव्या पाइपलाइन योजनेचे काम हाती घेतले आहे. सध्या ज्या मुख्यलाइनवरून पाणी सुरू आहे त्या पाइपलाइनला सिडकोच्या मुख्य लाइनवरून पाणी सुरू आहे. त्या पाइपलाइनला सिडकोच्या जिते फिल्टर प्लांटवर अडीचशे पॉवरचे दोन इलेक्ट्रीक पंप बसवून पाणी खेचल्याने या परिसरातील गावांना कमी दाबाने पाणी मिळत होते, मात्र त्यात ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात हद्द
झाली.
जोहे, कळवे, तांबडशेत, वरेडी, सोनरवार, उर्णोली, दादर या सात गावांना १० दिवस पाणीपुरवठा ठप्प आहे. उद्योगनगरी म्हणून गणेशमूर्ती निर्मितीचे कारखाने असलेल्या या गावकऱ्यांना पाण्यासाठी दिवस-रात्र हमरापूर फाट्यावरून पाणी खासगी वाहनातून न्यावे लागत आहे. (वार्ताहर)
सिडको व्यवस्थापनाबरोबर बैठक
पेण खारेपाट तहानलेला असताना जोहे विभागातही १० दिवस पाणी मिळत नसल्याने परिसरातील पाच ग्रामपंचायत सरपंचांच्या शिष्टमंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आ. धैर्यशील पाटील यांची भेट घेतली.
आमदारांनी या तक्रारीची दखल घेत सिडको अधिकारी वर्गाला विचारणा केली. यासंदर्भात या सरपंचांसह आ. धैर्यशील पाटील यांची बेलापूर येथे सिडको व्यवस्थापनासोबत बैठक शुक्रवारी होणार आहे. याबाबतची माहिती माजी सरपंच प्रमोद सदाशिव पाटील यांनी दिली.