संदीप जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : दरवर्षी सरकारी पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या नळ पाणीपुरवठा राबवण्यात येत आहे. मात्र तरीदेखील महाड तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे संकट कायम आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाड तालुक्याला मोठ्या पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ येवून ठेपलेली आहे. यंदा मार्च अखेरपासूनच टंचाईची झळ या तालुक्याला पोहचली असल्याने आजमितीला तालुक्यातील नऊ गावांसह ४२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली. तर १ गाव व ९ वाड्यांचे प्रस्ताव या विभागाकडे आल्याचेही सांगण्यात आले.छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर देखील पाण्याचे सर्वत्र स्रोत कोरडे पडल्याने सध्या गडावर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून यामुळे गडावर येणाऱ्या शिवभक्त पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तर महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुर्ला, कोथुर्डे धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदा जुलै अखेरपर्यंत हा साठा पुरेल त्यामुळे महाड शहरवासीयांना मात्र यंदा दिलासा मिळाला आहे. महाड तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस पडूनही अनेक गावे व वाड्यांमध्ये दिवसेंदिवस टंचाईत वाढच होत असल्याने, तसेच दरवर्षी करोडोच्या नळ पाणीपुरवठा योजना राबवून देखील दरवर्षीचे हे टंचाईचे संकट थांबता थांबेना यामुळे प्रशासन देखील हतबल झाल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील पिंपळकोंड, साकडी, ताम्हाणे, धनगरवाडी कावळे धनगरवाडी रावतही, नाणेधार गोंडाळे शेडगे कोंड, गोठवली किये, पदाचा कोंड, पाचाड मोहल्ला, पाचाड बौद्धवाडी, पाचाड नाका आदी गावे व वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून यंदा हा टंचाईग्रस्त वाड्यांचा आकडा शंभरावर पोहचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या नळ पाणी योजना राबवण्यात आल्या. मात्र या न.पा. योजनांमध्ये झालेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप तसेच अन्य तांत्रिक अडचणीमुळे यापैकी अनेक न.पा. योजनांची कामे अपूर्णावस्थेत पडत आहेत. त्याचा मोठा फटका या टंचाईग्रस्त वाड्यांना बसल्याचे प्रमुख कारण सांगण्यात येत आहे.
महाडमध्ये ९ गावे, ४२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
By admin | Updated: May 9, 2017 01:29 IST