२२७ गावे, वाड्यांमध्ये पाणीटंचाई
By Admin | Updated: April 27, 2017 00:04 IST2017-04-27T00:04:08+5:302017-04-27T00:04:08+5:30
तालुक्यात सावित्री, ढवळी, कामथी, घोडवनी, चोलई आदी नद्या पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. सावित्री नदीवरील बाजीरे येथील धरण सोडल्यास

२२७ गावे, वाड्यांमध्ये पाणीटंचाई
प्रकाश कदम / पोलादपूर
तालुक्यात सावित्री, ढवळी, कामथी, घोडवनी, चोलई आदी नद्या पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. सावित्री नदीवरील बाजीरे येथील धरण सोडल्यास तालुक्यात एकही धरण नाही. पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी फेब्रुवारीपासून तालुक्यातील बऱ्याच गावात पाणीटंचाई जाणवते. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे शेतीचे अतोनात नुकसान झाले.मात्र, त्यानंतर वाढत्या तापमानामुळे नदी, नाले, ओढे कोरडे ठाक पडले आहेत. आतापर्यंत ३८ गावे, १८९ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ पडला आहे. यात दुर्गम, अतिदुर्गम भागातील गावपाड्यांची संख्या अधिक असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात रानोमाळ भटकावे लागत आहे.
मागील दहा वर्षांत पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याचा मागोवा घेतला तर या गाववाड्यांवर विंधन-विहिरी, विहिरींची दुरु स्ती, साठवण टाकी, नळ पाणीपुरवठा योजना, छोटे तलाव आदी विकासकामांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत कोट्यवधी रु पयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, आजमितीस एकाही गाववाडीची पाणीटंचाईची समस्या सोडवण्यास यश आले नाही.
जिल्हा व तालुका प्रशासनाची उदासीनता, लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे तहानलेल्या गाव- वाड्यांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात या नद्या तुडुंब भरून वाहत असतात. या तालुक्यात एकूण ९ धरणे प्रस्तावित आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिल्यामुळे भूसंपादनाचे काम होऊ शकले नाही, तर काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कामे चालू होऊ शकली नाहीत. शिवकाळात पाण्याचे योग्य नियोजन केल्याचे दिसून येते. गडकोटांवर अजूनदेखील पाणी उपलब्ध
आहे.
प्रत्येककिल्ल्यावरील सर्व पाण्याच्या टाक्या आणि तलाव व्यवस्थित साफ करून पाण्याचे योग्य असे व्यवस्थापन केले तर आजूबाजूच्या १०० गावांना बाराही महिने मुबलक पाणीपुरवठा करता येईल. असे जवळपास ३८५ किल्ले महाराष्ट्रात आहेत. ३८५ पैकी ७० टक्के किल्ल्यांवर बाराही महिने पाणी असते. अगदी भर उन्हाळ्यातदेखील अपुऱ्या देखभालीमुळे दुर्गंधी आणि गाळ साचला आहे.
३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी जे जाणले ते आज आपले राजकारणी साधे अमलात आणू शकत नाहीत हे आपले दुर्दैव आहे. आजही प्रत्येक गावाला आपला विकास म्हणजे गावातील सभामंडप, अंतर्गत रस्ते म्हणजे विकास वाटतो. परंतु २१ व्या शतकात पदार्पण करत असताना पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे. त्यासाठी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ओढ्यानाल्यावर व नदीवर छोटे छोटे बंधारे होणे गरजेचे असून शिवकालीन पाणी योजना पुनर्जीवित कराव्या लागतील, तरच पोलादपूरचा पाणीटंचाई प्रश्न काही प्रमाणात सोडवता येईल आणि यामुळे टंचाईग्रस्त भागात दिलासा मिळेल.