पनवेलमध्ये लाखो लीटर पाणी वाया
By Admin | Updated: November 18, 2016 04:09 IST2016-11-18T04:09:45+5:302016-11-18T04:09:45+5:30
नवीन पनवेलमधील पंचशीलनगर येथील जलवाहिनी फुटल्याने येथील झोपडपट्टीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरले.

पनवेलमध्ये लाखो लीटर पाणी वाया
पनवेल : नवीन पनवेलमधील पंचशीलनगर येथील जलवाहिनी फुटल्याने येथील झोपडपट्टीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. लाखो लीटर पाणी वाहून गेल्याने दिवसभर पनवेलच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. अनेकांच्या घरातील अन्नधान्य, कपडे भिजल्याने गुरुवारी रात्रीच्या जेवणाचे वांदे झाले आहेत. गुरुवारी पनवेल शहरात सायंकाळी पाणीपुरवठाही होऊ शकला नाही. रात्री उशिरापर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे आता शुक्र वारी सकाळी पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गुरु वारी सकाळी ११.३० च्या दरम्यान नवीन पनवेलमधील रेल्वे रुळाजवळ असलेल्या पंचशीलनगरच्या बाजूला असलेली पाइपलाइन फुटली. पाण्याचा वेग इतका होता की, बाबू पवार यांच्या झोपडीची भिंत फोडून पाणी आत शिरले. त्यानंतर काही समजायच्या आत संपूर्ण वसाहतीत पाणीच पाणी झाले. झोपडपट्टीतील अनेकांचे संसार पाण्यात गेले. घरातील अन्नधान्य, कपडे, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भिजल्या. काही घरांमध्ये केवळ लहान मुले अथवा ज्येष्ठ व्यक्तीच असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हरिश्चंद्र बनकर यांच्या घरात यावेळी त्यांची ८० वर्षांची आई होती. घरात १ फुटापेक्षा जास्त पाणी शिरल्याने सर्वच सामान पाण्याखाली गेले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ही जलवाहिनी २५-३० वर्षे जुनी आहे. गुरुवारी सेक्टर ४ मधील दुरुस्तीसाठी शटडाऊन घेतले होते. दोन ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू होते. अचानक पंचशीलनगर येथील जलवाहिनी फुटल्याने शटडाऊनचे काम थांबवण्यात आले आणि एमजेपीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पंचशीलनगरमध्ये धाव घेतली.
जलवाहिनी फुटल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. जलवाहिनीचे काम उशिरापर्यंत करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न जीवन प्राधिकरणातर्फे केला जात आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे उप अभियंता एस.डी. दशोरे यांनी सांगितले. (वार्ताहर)