अवचित गडाची तटबंदी भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:29 IST2019-08-07T01:26:41+5:302019-08-07T01:29:27+5:30
पुरातत्त्व खात्याने लक्ष देण्याची मागणी; शिवकालीन किल्ला; पावसामुळे नुकसान

अवचित गडाची तटबंदी भिंत कोसळली
रोहा : तालुक्यातील मेढा येथील इतिहासाची साक्ष देणारा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील ठाण्यांपैकी महत्त्वाचे ठाणे म्हणून ओळख असलेल्या अवचित गडाच्या तटबंदीची भिंत कोसळली. तटबंदीची संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळे कोसळल्याने अवचित गडाकडे पुरातत्त्व खात्याने लक्ष देण्याची व ही तटबंदी पूर्ववत बांधून किल्ला सुरक्षित करण्याची मागणी गडकिल्ले गडप्रेमी व इतिहासप्रेमींनी केली आहे.
गेले १५ दिवस रोहा तालुक्यात अतिवृष्टीमुळे गडाच्या डाव्या बाजूची संरक्षण भिंत कोसळली आहे. रोह्यातील शिवशंभो प्रतिष्ठान हे गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी पावसाळी, उन्हाळी व हिवाळी ऋतूत आपल्या आसपासच्या परिसरातील अवचितगड, घोसाळगड आणि चणेरा येथील बिरवाडी किल्ला येथे नेहमीच स्वच्छता करण्यासाठी जात असतात. या वर्षीही शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी गडाची स्वच्छता करण्यासाठी गडावर फेरफटका मारला असता या गडप्रेमींच्या निदर्शनास आले, त्यामुळे या गंभीर गोष्टीकडे पुरातत्त्व खात्याने अवचितगडाची पाहणी करून ही तटबंदी भिंत बांधून हा इतिहासाचा ठेवा जतन करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया गडप्रेमींनी दिली.
अवचित गड, घोसाळगड, बिरवाडी या किल्ल्यांवर गेली काही वर्षे सातत्याने गड किल्ले संवर्धनाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.खऱ्या अथाने गड-किल्ल्यांचे संवर्धन पुरातत्व विभागाने करायचे आहे; परंतु रायगड किल्ल्यासारखे मोठे महत्त्वाचे काही किल्ले सोडले तर अन्य किल्ल्यांवर पुरातत्त्व विभाग देखभाल करताना दिसत नाही. अवचित गडाची भिंत तटबंदी पूर्ववत बांधण्याची मागणी पर्यटक, नागरिकांकडून होत आहे.