परराज्यातून वीटभट्टी कामगार रोह्यात दाखल
By Admin | Updated: November 17, 2015 00:07 IST2015-11-17T00:07:06+5:302015-11-17T00:07:06+5:30
दिवाळी सणानंतर वीटभट्टी व्यावसायिक आपल्या परंपरागत व्यवसायाकडे वळतात. वीट तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची जमवाजमव करून वीट व्यावसायिक हे

परराज्यातून वीटभट्टी कामगार रोह्यात दाखल
धाटाव : दिवाळी सणानंतर वीटभट्टी व्यावसायिक आपल्या परंपरागत व्यवसायाकडे वळतात. वीट तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची जमवाजमव करून वीट व्यावसायिक हे वीटभट्टी कामगारवर्गाची वाट पहात असतो. त्यामुळे वीटभट्टीचा व्यवसाय सुरु झाला असल्याने आता रोह्यासह ग्रामीण भागात वीटभट्टी कामगार हजर झाल्याचे दिसते.
वीटभट्टी उद्योगासाठी विशेषत: कर्नाटक, गुलबर्ग्याहून हंगामी कुशल कामगार कामासाठी सध्या रोह्यात हजर झालेत. रोह्यात विशेषत: पिंगळसई, शेणवई, कोलाड, खांब, गोवे यांसह इतर ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात वीट व्यावसायिकवर्ग वीटभट्टीचा व्यवसाय करताना दिसतो. शेतीनंतर उन्हाळी व हिवाळी हंगामात वीटभट्टी व्यवसाय हा त्यांचा ठरलेला असतो. आपले कर्नाटक राज्य सोडून हे कामगार महाराष्ट्रात एकत्र येऊन काम करीत स्थलांतर करीत असतात. या व्यवसायात काम करीत असताना माती काढून ती वाळविणे, त्यानंतर माती पाणी आणि भाताचा भुसा व्यवस्थित एकत्र करून वाळविल्यानंतर साच्यात भरून त्याला योग्य आकार देणे, त्यांचा थर लावून सुस्थित ठेवून कच्च्या विटांना भाजणे, अशी कामे हे कामगार करताना दिसत आहेत. या कामगारांना आणण्यासाठी सहा महिने अगोदरच खर्ची म्हणून काही रक्कम वीट व्यावसायिकांकडून देऊ केलेली असते. मात्र प्रत्येक आठवड्याला कामगारवर्गाला त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून मजुरी दिली जाते. (वार्ताहर)