रोहा तालुक्यातील भातसई येथील श्री महादेवीमातेची यात्रा
By Admin | Updated: April 12, 2017 03:50 IST2017-04-12T03:50:21+5:302017-04-12T03:50:21+5:30
जिल्ह्यातील सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील भातसई येथील श्री महादेवीमातेची यात्रा आणि पालखी सोहळा मोठ्या उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला. या यात्रेचे

रोहा तालुक्यातील भातसई येथील श्री महादेवीमातेची यात्रा
रोहा : जिल्ह्यातील सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील भातसई येथील श्री महादेवीमातेची यात्रा आणि पालखी सोहळा मोठ्या उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला. या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे भक्ताच्या पाठीला गळ टोचून त्यास खांबावरील लाकडाला टांगून फिरवण्यात आले आणि ‘हर हर महादेव’च्या गजराने परिसर दणाणून गेला.
येथील भातसई यात्रेची उत्सुकता दरवर्षी लोकांना असते, या यात्रेच्या तयारीसाठी भातसई, मेढा,लक्ष्मीनगर व झोळांबे या परिसरातील गावे लागलेली असतात. या वर्षीही या यात्रेची जय्यत तयारी गावातील ग्रामस्थ व भक्तगणांनी केली होती. घराला रंगरंगोटी, रांगोळीने व पताकांनी गावे सजविली होती. पूर्वसंध्येला पालखी मिरवणूक गावातीलपरिसरातून काढण्यात आली. गावातील सर्व भक्तगणांनी मोठ्या भक्तिभावाने या पालखीची पूजा-अर्चा करून मातेचे दर्शन घेतले. पारंपरिक खालू बाजा व पाश्चिमात्य डीजेच्या तालावर पालखी उत्सव संपन्न झाला. नजीकच्या गावातील मानाच्या महादेवाच्या काठ्या वाजत-गाजत मंदिराच्या परिसरात येतात. सांयकाळी गळटोचणी कार्यक्र माची उत्सुकता उपस्थित भक्तगणांत असते. या गावातील मातेच्या भक्तगणांना गळ टोचून खांबावरील लाकडाला टांगून फिरवण्यात आले. यावेळी सर्वत्र ‘हर हर महादेव’च्या गजराने परिसर दुमदुमून गेला. हा क्षण हजारो भक्तगणांनी आपल्या नजरेत टिपला. या व्यतिरिक्त नवसपूर्तीसाठीही काही भक्तगणांनी गळ टोचून घेतले होते.
मोठ्या प्रमाणात मिठाई, खेळणी, बांगड्या, कलिंगड, शीतपेय आदी दुकाने यात्रेत थाटण्यात आली होती. या सोहळ्यास मुंबई, पुणे या प्रमुख शहरांसह राज्यातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.
चैत्र पौर्णिमेच्या दिनी धार्मिक कार्यक्र म
चैत्र पौर्णिमेचा दिवस हा धार्मिक देवखर्चासाठी वर्षातून एकमेव असा येणारा दिवस म्हणून महत्त्वाचा मानला जातो. ग्रामीण भागात हा दिवस प्रसिद्ध असून आजच्या या दिवसाचे महत्त्व आणि औचित्य साधून कुटुंबातील कुलदेवांचा, तसेच गावदेवांचा देवखर्च म्हणजेच देणे मागणेचा धार्मिक कार्यक्र म केला जातो. त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या या दिवसाला ग्रामीण भागात अनन्य साधारण महत्त्व आहे. चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने काही ठिकाणी देवांना गोडा म्हणजेच शाकाहारी अन्नप्रसादाचे मानपान दाखविले जाते, तर काही ठिकाणी तिखट अन्नप्रसादाचे मानपानही दाखविले जाते. गावदेवांमध्ये श्री धावीर महाराज, श्री बापुजी बुवा, श्री काळकाई माता, सौरंग बापुजी बुवा, श्री क्षेत्रपाल आदी देवांचा देवखर्च ग्रामस्थ आणि भक्तगणांनी आजच्या पौर्णिमेच्या निमित्ताने केला.