The villagers stopped the construction of the soil dam in Amboli | आंबोलीतील माती बंधाऱ्याचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

आंबोलीतील माती बंधाऱ्याचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

मुरुड : खारभूमी विभागामार्फत मुरुड शहरातील मयेकर यांच्या शेतामधील पुढील भागापासून ते आंबोली येथील स्मशानभूमी परिसरापर्यंत मातीचा मोठा बंधारा बांधण्यात येत आहे. वरची आळी आंबोली गावातील ग्रामस्थांनी हे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणल्याने काम बंद पडले आहे. ग्रामस्थांनी खारभूमी विभागाच्या अनागोंदी कारभारावरसुद्धा आक्षेप नोंदवला आहे. काम पूर्ण झाले नसताना अ‍ॅडव्हान्स बिल का अदा करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करून कोट्यवधी रुपयांचे काम सुरू असताना खारभूमी विभागाचा कोणताही अधिकारी अथवा अभियंता उपस्थित राहत नाही, याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

लक्ष्मीखार, तेलवडे व आंबोली परिसरातील समुद्राचे पाणी भात शेतीमध्ये शिरू नये, यासाठी कोटी रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात येत आहे. तेलवडे, शीघ्रे ते आंबोली परिसरातील असंख्य एकर जमीन गेल्या कित्येक वर्षांपासून समुद्राचे पाणी जाऊन नापीक बनली आहे. यासाठी हा बंधारा बांधण्यात येत आहे. आंबोली स्मशानभूमीपर्यंत हे काम आले असून काम सुरू करताना ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम पूर्ण करण्यात येत असल्याची ओरड येथील ग्रामस्थांनी केली आहे. सर्व एकत्र जमून त्यांनी सुरू असलेल्या मातीच्या भरावाचे काम बंद पाडले आहे. या बंधाºयाची उंची या अगोदरच १२ फूट आहे. त्यावरच ठेकेदाराने फक्त सहा इंची मातीचा भराव टाकल्याचे ग्रामस्थांची ओरड आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसून, संबंधित ठेकेदाराने या कामाचे विश्लेषण ग्रामस्थांना भेटून करण्यात यावे, अशी मागणी केली. जोपर्यंत ठेकेदार ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करत नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असा एल्गार ग्रामस्थांनी करून सुरू असलेले काम तातडीने बंद करण्यात आले आहे. बंधाºयाचे काम बंद पाडण्यामध्ये खारआंबोली वरची वाडीमधील अध्यक्ष महादेव कमाने, मंगेश ठाकूर, मनोज दामोदर कमाने, संदीप ठाकूर, वसंत खंडागळे, हरी ठाकूर, महेंद्र बैकर आदी ग्रामस्थांचा सहभाग होता.
उपस्थित व्यवस्थापकाने ग्रामस्थांना मूळ ठेकेदारांशी संवाद करून दिला, त्या वेळी लवकरच येथील ग्रामस्थांशी भेट घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे अभिवाचन दिले आहे.

Web Title: The villagers stopped the construction of the soil dam in Amboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.