महामार्गावर वाहनांची वर्दळ
By Admin | Updated: September 16, 2015 23:58 IST2015-09-16T23:58:06+5:302015-09-16T23:58:06+5:30
गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. यावेळी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते.

महामार्गावर वाहनांची वर्दळ
पनवेल : गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. यावेळी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारी यावेळी वाहतूक पोलिसांची असते. त्यादृष्टीने महामार्गावर विविध उपाययोजना राबविण्यात आल्या असून तब्बल ३५० वाहतूक पोलीस व २० ते २५ अधिकाऱ्यांंना बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत.
मुंबईमधून सर्वात जास्त वाहने कोकणाकडे रवाना होतात. सायन पनवेल महामार्गाचे रुंदीकरण यावर्षी पूर्ण झाले. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही. मात्र खारघर टोल नाक्यावर कामोठे टोल प्लाझावर मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मंगळवारी संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी अगदी खारघर टोल नाक्यापर्यंत पोहचली होती. बुधवारी संध्याकाळीदेखील परिस्थिती जैसे थेच असल्याचे पहावयास मिळाले. पनवेल शहरातून गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. ही प्रवेशबंदी विर्सजनापर्यंत कायम राहणार आहे. कळंबोली सर्कलपासून ट्रक, टूरीस्ट वाहने, एसटी, टे्रलर, ट्रक, टेम्पो आदी वाहने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जी पर्यंत वळविण्यात आली आहेत. तक्का, पळस्पे फाटा तसेच पनवेल शहराबाहेरील अरुंद रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पाच लाखापेक्षा जास्त चाकरमानी खाजगी अथवा एसटी महामंडळाच्या वाहनांनी रवाना झाले.
यावर्षी ४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत कोकणवासीयांसाठी पनवेल ते चिपळूण ही १२ डब्यांची विशेष टे्रन सुरु करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या वर्गासाठी एक डबा व एक महिला वर्गासाठी डबा ठेवण्यात आला आहे. या टे्रनमध्ये जाण्यासाठी देखील प्रवाशांची मोठी गर्दी पनवेल रेल्वे स्थानकावर होती.
मागील तीन दिवसापासून या गर्दीमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाल्याचे बुधवारी दिसून आले. तसेच खारघर हिरानंदानी बस थांबा, कळंबोली, पनवेल याठिकाणच्या बसस्थानकावर देखील प्रवासी मोठ्या संख्येने थांबल्याचे दिसून येत आहेत. गुरुवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. यामुळे पुढच्या दहा दिवसापर्यंत दोन्ही महामार्गावर वाहनांची वर्दळ सुरु राहणार आहे. लाखो वाहने मुंबई गोवा महामार्गावरुन कोकणाकडे रवाना झाली आहेत.
खारपाडा टोलनाक्यावर या वाहनांची गणना केली जात होती. मात्र या वर्षी खारपाडा टोल नाका बंद झाल्याने वाहनांची निश्चित आकडेवारी वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचे समजले. (वार्ताहर)
कोकणाकडे जाताना वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणाकडे रवाना होत असतात यामध्ये खाजगी गाड्यांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. त्यातच अरुंद रस्त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते म्हणून वाहन चालकांनी याबाबत योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे. याकरिता महामार्गावर तब्बल ३५० वाहतूक कर्मचारी व २० ते २२ अधिकारी महामार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत आहेत.
- अरविंद साळवे,
वाहतूक पोलीस उपायुक्त