उरणच्या वीर वाजेकर कॉलेजमध्ये रंगणार विविध कार्यक्रम, कामोठेत महाभव्य रांगोळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2022 18:09 IST2022-12-06T18:04:18+5:302022-12-06T18:09:08+5:30
शरद पवार यांचा वाढदिवस, संसदीय कार्याला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजन

उरणच्या वीर वाजेकर कॉलेजमध्ये रंगणार विविध कार्यक्रम, कामोठेत महाभव्य रांगोळी!
मधुकर ठाकूर
उरण : भारताचे माजी कृषिमंत्री, पद्मविभूषण खासदार शरद पवार यांचा वाढदिवस आणि संसदीय कार्याला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फुंडे -उरण येथील वीर वाजेकर कॉलेजमध्ये अर्धं मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.११ डिसेंबर रोजी विविध वयोगटात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत रयतेच्या ४७ शाळा युनिटमधील सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.रयत संस्थेकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच या अर्धं मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत दिली.
रायगड,ठाणे, पालघर, मुंबई उपनगरातील रयतेच्या ४७ युनिटमध्ये सुमारे ६७००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शरद पवार यांचा वाढदिवस आणि संसदीय कार्याला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रयतच्या विविध शाळांमध्ये महारांगोळी , निबंध, वकृत्व स्पर्धा तसेच विज्ञान प्रदर्शन, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण आदी कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. तर शरद पवार यांच्या जीवनावर व्याख्यान होणार आहे.कामोठे येथील शाळेत शरद पवारांची २०० बाय २०० स्केअर फुटांची महाभव्य अशी पोर्ट्रेट महारांगोळीही काढण्यात आली आहे.११ डिसेंबर रोजी विविध वयोगटात आयोजित करण्यात आलेल्या अर्धं मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध खेळाडू ललिता बाबर, कविता राऊत यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या आयोजित कार्यक्रमाची सांगता विष्णूदास भावे नाट्यगृहात होणार आहे.याप्रसंगी शास्त्रज्ञ अनिल काकोडकर उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव, व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठीही या विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार बाळाराम पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याप्रसंगी प्राचार्य डॉ.पी.जी.पवार,रायगड विभागाचे इन्स्पेक्टर आर.पी.ठाकूर, महाविद्यालयाचे चेअरमन सुधीर घरत व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.