सहा तासांच्या शोधानंतरही बिबट्या न सापडल्याने गदारोळ; वरिष्ठ अधिकारी उतरले मैदानात, नागरिक शांत
By निखिल म्हात्रे | Updated: December 10, 2025 17:55 IST2025-12-10T17:51:24+5:302025-12-10T17:55:07+5:30
घोषणा देत नागरिकांनी शोध मोहिमेबाबत नाराजी व्यक्त केली.

सहा तासांच्या शोधानंतरही बिबट्या न सापडल्याने गदारोळ; वरिष्ठ अधिकारी उतरले मैदानात, नागरिक शांत
निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग- सहा तासांहून अधिक काळ लोटूनही बिबट्या वन विभागाच्या हाती लागला नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली. सुरक्षेच्या कारणास्तव घरातच थांबलेल्या ग्रामस्थांचा संयम सुटू लागला आणि प्रशासनाविरोधात गदारोळ सुरू झाला. “बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा”, “नागरिकांच्या जीवाला धोका आहे” अशा घोषणा देत नागरिकांनी शोध मोहिमेबाबत नाराजी व्यक्त केली.
परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच वाहतूक पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ आणि अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी किशोर साळे यांनी स्वतः पुढाकार घेतला. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रोटेक्शन जॅकेट परिधान करून थेट शोध मोहिमेत सहभाग घेतला. त्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह परिसरातील माळरान, झाडी, शेतजमिनी आणि वस्त्यांच्या आसपास पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः जीव धोक्यात घालून मोहिमेत उतरल्याचे पाहून संतप्त नागरिकांचा रोष कमी झाला आणि वातावरण हळूहळू शांत झाले.
या संपूर्ण मोहिमेत पोलीस क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम) ची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. क्यूआरटीच्या जवानांनी परिसरात सतत गस्त घालत नागरिकांना मार्गदर्शन केले. गर्दी नियंत्रणात ठेवणे, अफवा पसरू न देणे आणि संभाव्य धोक्याच्या ठिकाणी तत्काळ बंदोबस्त उभारणे, ही कामे क्यूआरटीने प्रभावीपणे पार पाडली. रात्रीच्या वेळी अतिरिक्त लाईट्स, सायरन आणि समन्वय यंत्रणा वापरून शोध अधिक तीव्र करण्यात आला.
पोलीस व वन विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास पुन्हा निर्माण झाला. “अधिकारी आमच्यासोबत आहेत” ही भावना निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. अखेर बिबट्याचा शोध घेण्याची मोहीम अधिक नियोजनबद्ध पद्धतीने सुरू राहिली. ही घटना प्रशासन, पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरली असून आपत्कालीन परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग किती महत्त्वाचा ठरतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.