‘आई डे केअर’चे अनोखे रक्षाबंधन
By Admin | Updated: August 28, 2015 23:20 IST2015-08-28T23:20:50+5:302015-08-28T23:20:50+5:30
आई डे केअरच्या विशेष मुलांनी बनवलेल्या राख्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शुक्रवारी पेण येथे झालेल्या लोकमत-वार्ताहर कार्यशाळेत आई डे केअरच्या विशेष मुलींनी लोकमतचे कार्यकारी

‘आई डे केअर’चे अनोखे रक्षाबंधन
अलिबाग : आई डे केअरच्या विशेष मुलांनी बनवलेल्या राख्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शुक्रवारी पेण येथे झालेल्या लोकमत-वार्ताहर कार्यशाळेत आई डे केअरच्या विशेष मुलींनी लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, चीफ फोटो एडिटर सुधाकर आेलवे यांच्यासह उपस्थित सर्व पत्रकारांना राख्या बांधून राखीपौर्णिमा साजरी केली.
आपल्या स्वत:च्या बावीस वर्षीय गतिमंद मुलीचे तिच्या जन्मापासून पालन पोषण करीत असताना लक्षात आलेल्या समस्यांचा सकारात्मक विचार करुन स्वाती मोहिते यांनी समाजातील गतिमंद मुलांकरिता सेवाभावनेतून आई डे केअर ही शाळाच सुरु केली. समाजाच्या मूळ प्रवाहातून थोडेसे बाजूला असलेल्या गतिमंद या समाज घटकाकडे काहीना काही विशेष गुण असतोच, तो शोधून काढून त्याला कलेशी जोडून त्यास व्यावसायाभिमुख सातत्यपूर्ण प्रशिक्षण दिल्यास गतिमंद मुले समाजाचा बोज न बनता स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात हे यंदा वास्तवात उतरल्याचे मोहिते यांनी सांगितले. मुलांच्या या यशस्वी व्यावसायिकतेमुळे त्यांचे पालक देखील आनंदून गेल्याचे मोहिते यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
व्यावसायिक प्रशिक्षण
गेल्या तीन वर्षांपासून शाळेतील ४२ गतिमंद मुलांना गणपतीकरिता ‘उंदीर’, रक्षाबंधनाकरिता ‘राख्या’ , मेणाची जास्वंदीची फुले असे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत होते. यातून प्रशिक्षित झालेल्या मुलांनी यंदा शाडूच्या मातीचे पाच हजार उंदीर तयार करुन पेणमधील गणेशमूर्तिकारांना विक्री केले तर रक्षाबंधनाकरिता १४ हजार राख्या तयार करुन पेण परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांना विक्री केल्या. आपल्याला आपल्या कष्टाचे पैसे मिळतात असा आत्मविश्वास या मुलांना यंदा गवसल्याचे मोहिते यांनी सांगितले.