दोन हजारांच्या नोटा ठरताहेत त्रासदायक
By Admin | Updated: November 14, 2016 04:29 IST2016-11-14T04:29:07+5:302016-11-14T04:29:07+5:30
मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करत दोन हजारांची आणि नवीन ५०० रुपयांची नोट बाजारामध्ये आणली.

दोन हजारांच्या नोटा ठरताहेत त्रासदायक
दासगाव : मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करत दोन हजारांची आणि नवीन ५०० रुपयांची नोट बाजारामध्ये आणली. गुरुवारपासून प्रत्येक बँक तसेच पोस्टामार्फत नागरिकांना चार हजार रुपयांप्रमाणे १०० रुपयांच्या नोटा देण्यास सुरुवात केली. तसेच नवीन आलेली दोन हजारांची नोट बाजारामध्ये पोहोचून गोरगरीब जनतेच्या हाती लागली; परंतु आजही बाजारामध्ये सुट्या पैशांची कमतरता आहे. नवीन आलेल्या ५०० रुपयांच्या नोटा अद्याप बाजारात आलेल्या नाहीत. यामुळे दोन हजारांची नवीन नोट जरी आली असली तरी एवढ्या मोठ्या नोटीला सुटे पैसे येणार कोठून हा प्रश्न समस्या बनल्याने सध्यातरी दोन हजारंची नोट त्रासदायक बनली आहे.
एक हजारांची नोट बंद करून त्या ठिकाणी दोन हजारांची नोट आणण्यात आली. शुक्रवारपर्यंत एक हजार आणि ५०० च्या नोटा बाजारामध्ये सुरू होत्या. मात्र, शासनाच्या निर्णयाप्रमाणे शनिवारपासून या नोटा चालणार नसून ज्यांच्याकडे आहेत त्यांनी बँकेत आपल्या खात्यांमध्ये भरायच्या आहेत. नोटांच्या बंदीनंतर एक दिवस सर्व बँका बंद ठेवून दुसऱ्या दिवशी उघडत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्या बँकामध्ये प्रति नागरिक चार हजार रुपये १०० रु.च्या स्वरूपात वाटप सुरू झाले. कोट्यवधी रुपयांच्या १०० च्या नोटा बाजारामध्ये आल्या; परंतु आजच्या बाजाराच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी नक्कीच कमी आहेत. आजच्या दिवसापर्यंत बाजारामध्ये ५०० ची नवीन नोट आलेली नाही. मात्र, दोन हजारांची नोट बाजारामध्ये येऊन गोरगरिबांच्या हातीही लागली. ही दोन हजारांची नोट नवीन चलनातील असली तरी आज खरेदीसाठी ही नोट बाजारामध्ये गेल्यानंतर दुकानदारांकडे या नोटीसाठी नागरिकांना परत देण्यासाठी १०० च्या नोटा तेवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. कारण सरकारने १०० च्या नोटावाटपाचीही मर्यादा ठेवली आहे. तर बँकेत पैसे भरल्यानंतरदेखील आठवड्याला २० हजारांची मर्यादा ठेवली आहे. यामुळे आजतरी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर सुटा पैसा उपलब्ध नाही.
बंदीनंतर तीन दिवस बाजारामध्ये ५०० आणि हजारांच्या नोटा सुरू होत्या. मात्र, शनिवारपासून या नोटा बाजारात कमी झाल्या असून सर्वसामान्य नागरिक, तसेच धंदेवाईकांनी पेट्रोलपंप, मेडिकल, डॉक्टर या सर्वांनी आता जुन्या नोटा घेण्यास बंद केल्या आणि सध्या बाजारामध्ये सुटे पैसेही कमी असल्याने सामान्य नागरिक चक्रावून गेला आहे. दोन हजारांचे सुटे पैसे दुकानदारांकडे नसल्याने पैसा असून ही नागरिकांची गैरसोय होत आहे. (वार्ताहर)