Tribal employment increased in Shravan; Demand for vegetables | श्रावणात वाढला आदिवासींचा रोजगार; भाज्यांना मागणी
श्रावणात वाढला आदिवासींचा रोजगार; भाज्यांना मागणी

मोहोपाडा : मोहोपाडा, वावेघर, चौक बाजारपेठांमध्ये भाजी विक्री चांगल्या प्रकारे होत असल्याने स्थानिकांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.
सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे मांसाहार करणारे देखील या महिन्यात भाजीच खाणे पसंत करतात. त्यातच चौक व रसायनी परिसरालगतचे शेतकरी व आदिवासी बांधव भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. यात शिराळे, घोसाळी, काकडी, भेंडी, पडवळ, पाल्याची भाजी व आता रानात किंवा शेताच्या बांधावर मिळणारे कवला, भारंगी, कुर्डू यांची विक्री चांगल्या प्रकारे होत आहे. ही भाजी घेण्यासाठी स्थानिकांबरोबर शहरी भागातील लोक गाड्या उभ्या करून भाजी खरेदी करताना सर्व ठिकाणी दिसत आहेत. तसेच या परिसरातील गावतलावांमध्ये शिंगाडा या फळाची शेती केली जाते, ही फळे घेण्यासाठी गुजराती व मारवाडी ग्राहक जास्त असल्याचे शिंगाडा विक्रेता सांगतात. शिंगाडा हा उपवासासाठी खातात,त्याचे विविध प्रकारची डिश बनवली जाते. ८० ते १०० रुपये किलोने विक्री होते, तर भाज्या ६० ते ९० रुपये व रानातील भाजी १० रुपये जुडीने विकली जाते. या व्यवसायाने अनेक स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.


Web Title: Tribal employment increased in Shravan; Demand for vegetables
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.